वडगाव शेरीमधून महायुतीच्या सुनील टिंगरे यांना तिकीट (फोटो- ट्विटर)
पुणे: वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघात दाेन राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्येच लढत रंगणार आहे. यामध्ये महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यासमाेर भाजपची नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांना भाजपचे पदाधिकारी साथ देतील का? हा कळीची मुद्दा ठरणार आहे. शहराच्या उत्तर पुर्व भागात असलेल्या या मतदारसंघाचे भाैगाेलिक क्षेत्रही माेठे आहे. २००९ साली झालेल्या निवडणुकीत युतीकडून शिवसेनेचे अजय भाेसले हे लढले हाेते. तेव्हा भाेसले यांचा बापू पठारे यांनी पराभव केला हाेता. २०१४ साली जगदीश मुळीक यांनी भाजपच्या लाटेत हा मतदारसंघ जिंकला हाेता. यानंतर या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. या भागातील काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७ साली झालेल्या महापािलका निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढली हाेती. २०१४ साली विद्यमान आमदार टिंगरे हे शिवसेनेकडून लढले हाेते. तेव्हा टिंगरे यांनी मुळीक यांना चांगली लढत दिली हाेती. २०१९ साली टिंगरे हे राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून रिंगणात उतरले. त्यांनी हा मतदारसंघ भाजपकडून काबीज केला. या निवडणुकीत विद्यमान आमदार मुळीक हे पराभूत झाले हाेते.
गेल्या अडीच वर्षात राज्यातील राजकीय परीस्थिती बदलली. त्याचप्रमाणे वडगाव शेरी मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुतीतील अंतर्गत पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. भाजपला हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात हवा हाेता. परंतु, ताे अखेरपर्यंत मिळू शकला नाही. माजी आमदार मुळीक यांना पक्षाकडून ए.बी. फाॅर्मही दिला गेला हाेता. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाेन करून मुळीक यांची समजुत काढली. त्यामुळे या मतदारसंघात आता दुरंगी सामना हाेणार आहे. या मतदारसंघात आजपर्यंत तीन निवडणुका झाल्या आहेत. प्रत्येक वेळी नवीन आमदार निवडुन आला आहे. मतदारांनी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली नाही, असे चित्र येथे आहे. परंतु यावेळी एक विद्यमान आणि एक माजी आमदार समाेरासमाेरआहेत.
भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या पदरी निराशा
लोकसभा निवडणुकीत वडगावशेरीतून मुरलीधर मोहोळ यांना मताधिक्य मिळवून देण्यात माजी आमदार जगदीश मुळीक यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यामुळे या मतदार संघातून निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आग्रही हाेते. त्यांच्या पदरी निराशा आली आहे. ही नाराजी दुर करण्याचे आव्हान महायुतीच्या नेत्यांपुढे असणार आहे. टिंगरे आणि मुळीक यांच्यातील राजकीय वैमनस्य गेल्या तीन वर्षात दिसुन आले. सातत्याने एकमेकांवर टिका , आरोप त्यांच्याकडून केले गेले. आता एकत्रित मत मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
हेही वाचा: Maharashtra Election 2024: वडगाव शेरीत भाजपच्या जगदीश मुळीकांचा यू-टर्न; देवा भाऊंचा एक फोन आणि…
मनसेचा उमेदवार नाही, आरपीआय नाराज
वडगांव शेरी मतदारसंघात मनसेचा मतदार आहे. ताे निर्णायक भुमिका घेऊ शकताे. मनसेकडून या मतदारसंघात उमेदवार उभा केला गेला नाही. यामुळे मनसेचे कार्यकर्ते काेणाच्या बाजुने काैल देणार हे महत्वाचे ठरणार आहे. महायुतीच्या जागा वाटपात आरपीआय (आठवले गट) कडून हा मतदारसंघ मागितला गेला. परंतु, त्यांना मिळाला नाही, यामुळे आरपीआयचे स्थानिक कार्यकर्ते नाराज असून माजी उपमहापाैर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मतदारसंघात बसपा, राष्ट्रीय समाज पक्ष आदी राजकीय पक्षांचे उमेदवार असून त्यांना किती मते मिळणार यावर निकाल अवलंबुन आहे.
पाेर्शे कार अपघाताचा राजकीय वापर ?
पाेर्शे कार अपघाताचा विषय या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उचलला जाण्याचे सुताेवाच यापुर्वीच मिळाले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांनी विद्यमान आमदार टिंगरे यांच्यावर जाेरदार टिका केली आहे.