कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्यावर विधीमंडळामध्ये हक्कभंग दाखल (फोटो - सोशल मीडिया)
कुरुंदवाड : खासदार धैर्यशील माने व माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिवसेनेने काय कमी केलं होतं खासदारकी आणि मंत्री पद दिले असतानाही शिवसेनेशी गद्दारी करून जातीचे आणि धर्माचे विष पेरणाऱ्या भाजपासोबत संगत केली आहे. अशा आमदार खासदारांना येत्या निवडणुकीतुन खड्यासारखे बाजूला फेकून आपल्या मनातील आमदार व खासदार करावा असा घणाघात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येथे बोलताना केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाप्रबोधन यात्रेनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपनेत्या संजना धाडी, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते.
त्यापुढे म्हणाल्या, हा महाराष्ट्र संतांनी घडवला आहे. राज्यातील ज्या आमदार आणि खासदारांंनी शिवसेनेचे चिन्ह घेऊन निवडणूकीत निवडून आले त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी धैर्यशील माने कोठे होते. ते अडगळीत पडला होते. त्या आधीही त्यांनी विश्वासघात केला होता. आणि ते विश्वासघातकी आहे. मातोश्रीचे हृदय मोठे आहे.
मानेंना इंगा दाखविण्याची गरज
त्या धैर्यशील माने यांंना प्रवक्तेपद देऊनही खासदारकी दिली. आता त्यांंनी गद्दारी केली आहे. त्यांंना इंगा दाखवण्याची गरज आहे. तर शिरोळचे अपक्ष आमदार निवडून आले त्यांनी शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळवले निधी मिळाला नाही म्हणून त्यांनी टाहो फोडला पण त्यांना ५५० कोटीचा निधी दिला आहे. पण ते खोटं बोलत आहेत. संविधानावर सही असलेले देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या आशीर्वादाने हे मोठे झालेले यड्रावकर घराणे आहे. बंद असलेली सूतगिरणी चालू करायची आणि अनुदान लाटायचे चांगली चाललेली सूतगिरणी बंद केल्याने ३ हजार कामगार बेकार झाले आहेत. त्यांची देणी बुडवली, ११० एकर जमिनीचे काय केले, कोणाला दिली याचे उत्तर त्यांनी देणे गरजेचे असून सूतगिरणीचे सत्तावीस हजार सभासद असून त्यांचा त्यांनी विश्वासघात केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणतात मी बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन पुढे जात आहे. मात्र दिवाळीला आनंद शिधा वाटला त्यावर आनंद दिघे अथवा बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता मोदींचा फोटो लावला आहे. मग यांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. शिक्षणाचे भाव गगनाला भिडले असून बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी पालकांना ३० ते ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. सक्तीचे व मोफत शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. बीएसएनएलची रेंज घालवून जिओची रेंज वाढविली, तर सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळा चालू करण्याचा कूटील डाव हे शासन करीत आहे.
राज्यात महिलांना हीन मानले जातेय
माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यकाळात अडीच वर्षात कोरोना आला त्यांनी एका ठिकाणी बसून कामे केले. राज्यात कोणालाही खाण्याचे आभाळ होऊ दिले नाही. मात्र सध्याच्या सरकारातील मंत्री एकनाथ शिंदे घरी जात नाही असे म्हणतात. मात्र ते मंत्रालयात ही जात नाहीत ते फक्त देवदर्शन आणि गुहाटीला जातात. जाती धर्माचे विष पेरणारे लोक भारतीय जनता पक्षाने आणले आहेत. जात धर्माच्या नावावर निवडणुकीची गणिते भारतीय जनता मांडत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. यावरून यावरूनच राज्यात महिलांना हीन मानले जात असून मनुवादींंचा दृष्टिकोन महिलांना तुच्छ मानत आहे. मात्र एकनाथ शिंदे हे देवेंद्रजींची रिमोट बाहुली आहे. राण्यांची दोन बारकी पोरं उंची नसताना मातोश्रीवर गरळ ओकली मात्र त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांवर व रामदास कदमवर कारवाई न केल्याने गुलाबराव पाटलांचा व अब्दुल सत्तारांचा माज वाढला. भाजप व गद्दारांचा निवडणूक आयोगाशी लागेबांधे होते. त्यामुळे निकाल लागायच्या अगोदरच त्यांनी ढाल तलवार चिन्ह मिळणार म्हणून तलवार आणली होती. या सरकारने गुजरातला अनेक उद्योग घालवल्याने महाराष्ट्रातील लाखो युवकांना बेरोजगार केले असल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच या सरकार बाबत लोकांच्यात संतापाची लाट सुरू झाली आहे. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारांनी या गद्दारांची सिंहासने उलटी करून विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अंधारे यांनी केले.
यावेळी शिवसेना उपनेत्या संजना धाडी म्हणाल्या की, राज्यात सर्वत्र गद्दाराबद्दल नागरिकांतून चीड निर्माण झाली असून सत्तेच्या गादीसाठी गुजरातला उद्योगधंदे पाठवून महाराष्ट्रातला वेठीस धरले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगार दावणीला लागत असून प्रकल्प गेल्याने लाखो रोजगार गेले. त्यामुळे महाराष्ट्र अधोगतीला लागला आहे. सध्या राज्यकर्त्यांची दडपशाही चालली असून भारताचे लोकशाही संविधान दावणीला लागले आहे. राज्य सरकारात बेशिस्त कारभार सुरू असून त्यामुळेच सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. निवडणुका जवळ येतील तशी जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे नेते करीत आहेत.
माजी आमदार उल्हास पाटील, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे, शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, आण्णासाहेब बिलोरे, बाजीराव मालुसरे, संजय आणूसे, राजू आवळे, उपनेत्या संजना धाडी, मंगला चव्हाण, वैशाली जुगळे, आप्पासो भोसले, साताप्पा भवान, दयानंद मालवेकर, रामभाऊ माळी, विलास उगळे, नामदेव गिरी, महादेव गौड, माधुरी टाकारे या मान्यवरासह शिवसैनिक शेतमजूर उद्योजक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.