फोटो - संग्रहित
जालना : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यामध्ये राजकीय उलथापालथ होणार आहे. यंदाची निवडणूक जोरदार रंगणार असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. यामध्ये आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून आरक्षण न दिल्यास निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूकीची तयारी सुरु केली असून मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून ओबीसीमधून सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी उपोषण व आंदोलन देखील केली आहे. राज्य सरकारला 13 ऑगस्ट ही पुढची तारीख जरांगे पाटील यांनी दिली आहे. मात्र आरक्षण मिळाले नाही तर निवडणूक लढवणार असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे इशारा जरांगे पाटील यांनी दिला. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी तयारी सुरु केली आहे.
असा असेल प्लॅन
मनोज जरांगे पाटील हे येत्या सात ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघनिहाय आणि तालुकानिहाय इच्छुकांनी आपली माहिती अंतरवाली सराटी येथे जमा करायची आहे. विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी स्वतःच्या परिचयपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागणार आहे. अंतरवाली सराटी येथे 7 ऑगस्टपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दाखल झालेल्या सर्व अर्जाची छाननी कोअर कमिटी करणार आहे. 13 ऑगस्टपासून इच्छुकांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. मनोज जरांगे पाटील स्वतः निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यानंतरच उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रक्रिया येत्या 13 ते 20 ऑगस्टदरम्यान पूर्ण केली जाणार आहे. विधानसभानिहाय उमेदवारांची आदी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे.