Manoj Jarange
Maratha Reservation : राज्यभर गाजलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील हप्त्यामध्ये निकाली निघाल्याचा आनंद मराठ्यांनी साजरा केला. मनोज जरांगे पाटलांनी 26 जानेवारीला आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तत्पूर्वी अंतरवालीपासून निघालेला मराठा मोर्चा नवी मुंबई वाशीपर्यंत येईपर्यंत सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्याचबरोबर सरकारने अध्यादेश देत, मराठा समाजाच्या नोंदीवरून मसुदा तयार केला आहे. त्याचबरोबर सगेसोयरेवरून हा शब्द या अध्यादेशात नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.
अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणीसाठी पुन्हा उपोषण
आता सरकारने या अध्यादेशावर हरकती मागवल्या आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी या अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याकरिता पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आता 10 फेब्रुवारी 2024 पासून मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. यावर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सांगितले की, मी कधीही काहीही खोटं केले नाही आणि करणार नाही. मराठ्यांविरोधातील षडयंत्र यशस्वी झाले नाही. तुम्हाला श्रेय घ्यायचे असेल तर घ्या, पण समाजात खोटं पसरवू नका. कोणता नेता खोटं पसरवायला सांगतो आहे त्याचे नाव आम्हाला कळाले आहे. सत्तेतील काही लोकं सोशल मिडीयावर टीका करायला उतरलेत.
३९ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र
मनोज जरांगे पाटलांनी सांगितले की, ३९ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे. जे ७० वर्षांत मिळाले नाही ते आमच्या आंदोलनातून मिळाले आहे. ५४ लाख मराठा-कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. नोंदी सापडलेल्यांनी अर्ज केल्यावर प्रमाणपत्र मिळणार आहे. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश सरकार काढत नव्हते. आपण मुंबईला गेलो आणि अधिसूचना घेऊन आलो. सोशल मिडीयावर लिहिणारे गप्प बसले नाहीत तर नावं जाहीर करणार. १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार. अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर व्हावे यासाठी उपोषण करणार. आंदोलनामुळे शिंदे समिती गठीत झाली. गोरगरिबांना मिळालं म्हणून काहींचे पोट दुखते आहे.