संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरु झाला असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. 20 तारखेपासून पु्न्हा उपोषण सुरु करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. आम्ही सर्व मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढील निर्णय घेणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी हिंगोलीतून आपल्या शांतता रॅलीला सुरुवात केली होती. त्यानंतर, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून दौरा करत आज छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी आपल्या रॅलीचा सांगता केली. यावेळी, संभाजीनगरमधून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
जरांगे नेमकं काय म्हणाले ?
आजपासून आमची पुढची रणनिती सुरु झाली आहे, येत्या 20 तारखेला पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, तसेच 20 तारखेला महाराष्ट्रातील मराठ्यांची बैठक ठरवली जाणार आहे. 288 जागा लढवायच्या की पाडायच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच छगन भुजबळांनी धनगर बांधवांचा वापर करून राजकीय फायदा घेवू नये, धनगर आणि मराठ्यांचं वैर भुजबळांनी लावलं, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दीड कोटी मराठे ओबीसीत आले आहेत
40 वर्ष लढणाऱ्याना सरकारने काहीच दिले नाही, पण 10 महिन्यात काही ना काही मिळालंय ना?. दीड कोटी मराठे ओबीसीमध्ये आले आहेत. छगन भुजबळ तू पायावर चालतो मी डोक्यावर चालतो, असे म्हणत पुन्हा एकदा छगन भुजबळांवर जरांगेंनी हल्लाबोल केला. तसेच, विधानपरिषद निवडणुकांच्या निकालावर भाष्य करत, काल जे 20-25 आमदार निवडून आले ते मराठ्यांच्या मतावर निवडून आले आहेत, आलेले सर्वच्या सर्व बावळे आहेत, असे जरांगे यांनी म्हटले. तसेच, विधानपरिषदेच्या आमदारांना कोणत्या मराठ्याच्या नेत्यांनी मतदान केले, माझ्याकडे यादी येणार आहे, असेही ते म्हणाले. ओबीसी आमदारांना मतदान करणाऱ्या मराठा आमदारांना जाब विचारा, असेही ते म्हणाले.