काँग्रेसची आघाडी, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; दर्यापुरात १६ जागांवर काँग्रेस विजयी
नगरपरिषदेच्या निवडणूक निकालातून काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले. एकूण २४ जागांपैकी काँग्रेसने १६ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापनेचा मजबूत दावा केला आहे. भाजपला ५ जागांवर, शिवसेनेला ३ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला १ जागेवर समाधान मानावे लागले. उर्वरित ठिकाणी अपक्ष वा इतर पक्षांचा प्रभाव मर्यादित राहिला. बहुसंख्य वॉर्डात काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवत मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. भाजपला काही ठिकाणी मोठे मताधिक्य मिळाले असले, तरी एकूण आकडेवारी पाहता काँग्रेसच या निवडणुकीची निर्विवाद विजेती ठरली आहे.
या निवडणुकीत वॉर्ड क्र. ८ अ मध्ये काँग्रेसच्या वर्षा बौरेकर यांनी ९४० मतांच्या मोठ्या फरकाने (१९३९ विरुद्ध ९९९) विजय मिळवला. तसेच, वॉर्ड ८ व मध्ये समीना परवीन यांनी ११३६ मतांचे मताधिक्य (१९३५ विरुद्ध ७९९) मिळवून काँग्रेसचा झेंडा फडकावला. वॉर्ड ६ अ मध्ये भाजपचे
रोशन कट्यारमल यांनी १०५७ मतांच्या फरकाने (१४३२ विरुद्ध ३७५) काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत भाजपचा सर्वात मोठा विजय नोंदवला.
चुरशीच्या लढती वॉर्ड १ ‘अ’ मध्ये भाजपचे दिनेश पारडे यांनी काँग्रेसच्या संतोष शिंदे यांचा अवघ्या ३४ मतांनी (६३८ विरुद्ध ६०४) पराभव केला. वॉर्ड ११ ‘ब’ मध्ये काँग्रेसच्या स्नेहा देशमुख यांनी भाजपच्या भाग्यश्री राजपूत यांच्यावर केवळ ७ मतांनी (६६१ विरुद्ध ६५४) विजय मिळवत निवडणुकीतील सर्वांत अटीतटीचा निकाल दिला.
सर्वाधिक मते मिळवण्याचा मान काँग्रेसच्या वर्षा बोरेकर (१९३९ मते) आणि समीना परवीन (१९३५ मते) यांना मिळाला.
या निवडणुकीत वॉर्ड १ व मधील भाजपच्या शीतल धोटे यांना सर्वांत कमी म्हणजेच २९५ मते मिळाली.






