गडचिरोलीत अनेक शाळा संरक्षण भिंतीविनाच; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर (संग्रहित फोटो)
गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांना देशाचे भवितव्य म्हटले जाते. राज्याचा शेवटचा टोक असलेल्या आदिवासीबहूल, अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासन देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील दुर्गम, ग्रामीण भागातील शेकडो जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आहे.
पालक तसेच स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांद्वारे शिक्षण विभागाकडे याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. तरीही दुर्लक्ष केले जात असल्याने शालेय आवारात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता बळावली आहे. शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये संरक्षक भिंती नाहीत. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी असुरक्षित वातावरणात विद्यार्जन घेत असल्याचे दिसून येत आहे.
नुकताच सोमवारपासून (दि. 23) नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांसह शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत उत्सवासारखे साजरे करण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा जिल्हाभरातील शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. शासन, प्रशासन विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी विशेष दक्षता बाळगत आहे. मात्र, जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक शाळांना संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने घेत शाळेत संरक्षण भिंत बांधकामासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
दुर्गम क्षेत्रात अनुचित प्रकाराचा सर्वाधिक धोका
गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत जि. प. च्या पंधराशेहून अधिक शाळा कार्यरत आहेत. यामध्ये प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांचा समावेश आहे. यामध्ये ग्रामीण व दुर्गम क्षेत्रातील जि. प. शाळांची दैनावस्था निदर्शनास येत आहे. अनेक शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत आहेत. काही ठिकाणी शौचालय, स्वच्छतागृहांचा अभाव दिसून येतो. तर जवळपास शेकडो शाळांना सुरक्षा भिंतींचा अभाव आहे. परिणामी, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
हिंस्त्र प्राण्यांसह वन्यजीवांचा धोका
दुर्गम भागातील अनेक शाळा घनदाट वनाच्छदित भागात मोडतात. या भागात हिंस्त्र प्राण्यांसह, वन्यजीवांचा नेहमीच धोका असतो. संरक्षक भिंतीअभावी सदर वन्यजीव शाळा आवारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील अनेक वर्षापासून या शाळांना संरक्षण भिंती बांधण्यासंदर्भात पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांद्वारे होत आहे. मात्र, याकडे कायम दुर्लक्ष केले जात असल्याने या शाळांमध्ये अनुचित घटना घटण्याची शक्यता बळावली आहे.