Pimpri News : तुम्हीही अनधिकृत बांधकाम केलंय? तर आता महापालिकेचा हातोडा पडणार (फोटो - सोशल मीडिया)
पिंपरी : सध्या पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधातील कारवाईचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला. या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई अधिक तीव्र आणि प्रभावी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, अतिक्रमण विभागाचे मुख्यालय उपायुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान शहरातील अनधिकृत बांधकामे, रस्ते व नाल्यांवरील अतिक्रमणे आणि त्यावरील निष्कासन मोहिमेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच आगामी कारवाईसंदर्भातील नियोजन आणि प्रस्तावित उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
दरम्यान, आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिक्रमणांविरोधातील कारवाई अधिक कठोरपणे राबवणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी करून कारवाईची सातत्याने अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, रस्त्यांवर अनधिकृतपणे स्टॉल लावणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकात बोगस उपसूचनांच्या आधारे तरतुदींमध्ये फेरफार करून ठेकेदारांना ५२ कोटी रुपयांची देयके अदा केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी ही देयके बँकेतून रोखल्याची खोटी माहिती देऊन आयुक्तांचीही दिशाभूल केली, असा गंभीर आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी पत्रकार परिषदेत केला.






