मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांची उपोषणस्थळी भेट घेतली (फोटो - सोशल मीडिया)
अमरावती : प्रहार संघटनेचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू हे सध्या आंदोलन करत आहेत. बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले असून आज (दि.11) त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि सातबारा कोरा करण्याच्या मुद्यावरून आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांनी मागील तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. बच्चू कडू यांची मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या पाठीशी मराठा समाजाची ताकद एका अर्थी उभी राहिली असल्याचे बोलले जात आहे.
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी जवळ अन्नत्याग आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच जो पर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला. त्यांना काल (दि.10 जून) जेष्ठ नेते शरद पवार यांनी फोन करुन विचारपूस केली. यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. यावेळी जरांगे पाटील यांच्यासमोर भूमिका मांडताना कडू म्हणाले की शेतकऱ्यांची लढाई ही सर्व जाती सर्व धर्मातील लोकांची आहे. आता त्यांनी एमआरजीसीवर काम करणाऱ्या मजूरांचे पैसे हे सहा महिन्यांपासून दिलेले नाही. असं कसं चालायचं? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
आंदोलनस्थळाहून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू हे गोरगरीबांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. बच्चू भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू, सरकारला सळो की पळो करुन सोडू. बच्चू कडू यांच्या मागण्याची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जात-पात न पाहता रस्त्यावर उतरायला हवं. कारण जीवाची बाजी लावणं सोपं नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल शरद पवार यांनी घेतली असून प्रशासनाने देखील घेतली आहे. बच्चू कडू यांनी सांगितले की, “कलेक्टर आणि एसपी भेटायला आले होते, तसेच पालकमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग आयोजित करुन देऊ अशी माहिती दिली आहे. मात्र मी मीटिंगच्या बदल्यात उपोषण मागे घेणार नाही. आम्हाला भेट नको, निर्णय हवा आहे.” अशी मागणी केली आहे.