फोटो - टीम नवराष्ट्र
संभाजीनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. त्यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस असून संभाजीनगरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांचा दौरा मराठा कार्यकर्त्यांमुळे जास्त चर्चेत राहिला आहे. राज्याला आरक्षणाची गरज नसल्याच्या भूमिकेवर देखील राज ठाकरे ठाम राहिले आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज का नाही याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले. या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी जेष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागून शरद पवार व उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावले. राज म्हणाले, “माझ्या मराठवाडा दौऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा काहीही संबंध नव्हता. म्हणजे त्यांच्या विषय पण नव्हता. आपल्याकडे आरक्षणावरुन फक्त जातीय राजकारण केले जात आहे. जातीच्या राजकारणातून तरुणांची माथी भडकवली जातात. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मागून उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यासारखी मंडळी राजकारण करत आहेत. मराठवाड्यामध्ये ते दिसून येत आहे. धाराशिवमध्ये माझ्या हॉटेलखाली आलेल्या लोकांमध्ये देखील या दोन नेत्यांचे समर्थक होते. तुतारीसोबत या लोकांचे फोटो आहेत. उद्धव ठाकरे गटाचे देखील दोन लोकं होती. नांदेडमध्ये सर्किट हाऊसवर जाऊन ओरडणाऱ्या दोन लोकांपैकी एकाचा शरद पवारांसोबत आत्ताचा फोटो आहे. काल जे झाले त्यामध्ये शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होता,” असा गंभीर खुलासा राज ठाकरे यांनी केला.
यांना 3 महिन्यात दंगली घडवायच्या आहेत
पुढे राज ठाकरे यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, “हे सर्व लोकसभेच्या निवडणूकीनंतर सुरु झालं आहे. मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे व शरद पवार यांना वाटत आहे की त्यांना खूप मतदान मिळालं आहे. पण महाविकास आघाडीला जे मतदान झालं ते शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या प्रेमासाठी झालेले नाही तर मोदींविरोधासाठी झालं आहे. त्यांना असं वाटत आहे की येणाऱ्या विधानसभेसाठी देखील अशाच पद्धतीचे राजकारण करावे. समोर येणारी लोकं पक्षाची आहेत. मात्र ती घोषणा एक मराठा लाख मराठा अशी देत मनोज जरांगेंची माणसं असल्याची दाखवत आहेत. आणि अशा प्रकारे महाविकास आघाडी राजकारण करत आहे. हे लोकांसमोर येणं गरजेचे आहे. शरद पवारांसारखा 83 वर्षाचा माणूस वक्तव्य करतो की महाराष्ट्राचं मणिपूर होईल म्हणून, यांच्या डोक्यात काय चालू आहे ते लक्षात येतं. यांना मराठवाड्यामध्ये येत्या तीन महिन्यांमध्ये दंगल घडवायच्या आहेत,” असे गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आधीची ५ वर्षं भाजपाबरोबर केंद्रात, राज्यात नांदत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी शब्द का नाही टाकला? जरांगे पाटलांच्या पाठीमागून यांचं राजकारण मतं मिळवण्यासाठी चालू आहे. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ, माझ्या नादी लागू नका. माझी पोरं काय करतील हे यांना कळणारही नाही. नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ, पोट आणि गालपण बघावे लागतील. शरद पवारांच्या वयाचा बुजुर्ग नेता महाराष्ट्रात आज नाही. शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे की हे असलं जातीय राजकारण महाराष्ट्रात पसरता कामा नये. पण तुम्हीच याला हातभार लावताय का?” अशा कडक शब्दांत राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले आहेत.