मुंबई मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन छेडलं आहे. मराठ्य़ांना आरक्षण मिळणार का याबाबत अद्यापतरी स्पष्ट भूमिका सरकारच्या वतीने घेण्यात आलेली नाही. मराठा समाजाच्या मागणीकडे सरकारे लक्ष द्यावं या उद्देशाने आक्रमक झालेला मराठा आंदोलक आज मुंबईच्या प्रत्येक गल्लीत तीव्र आंदोलन छेडत आहे. याच आंदोलनाचा गैरफायदा घेत शहरात काही समाजकंटकांनी आंदोलकांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.
स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारे मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात पांढरे कपडे आणि गळ्यात भगवा रुमाल असा एकंदरीतच त्यांचा पेहराव आहे. याचाच फायदा घेत शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याच देखील समोर आलं आहे. आंदोलनात सामील झालेल्या काही तरुणांनी फोर्ट परिसरात चोरी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आंदोलनातील काही तरुणांनी कपड्यांच्या दुकानात चोरी केल्याचं उघड झालं आहे.
पोलीसांनी प्राथमिक तपासानुसार, आंदोलनात सामील झालेल्या काही तरुणांनी कपड्याच्या दुकानाचं कुलुप तोडून घुसखोरी केली. त्यानंतर काही कपडे आणि 6 हजार रुपयांची रक्कम चोरली. ही घटना घडल्याचं दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. याबाबत दुकानदाराने पोलीसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीसांनी अज्ञात टवाळखोर तरुणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे सरकारने आरक्षण मिळवून द्यावं म्हणून आक्रमक झालेला मराठा समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. या आंदोलनाला समाजातील इतर घटक देखील पाठिंबा देत आहे. तर दुसरीकडे याच मराठा आंदोलकांची प्रतीमा मलीन करण्याचा त्यांना बदनाम करण्याचा प्रकार होत असल्याचं दिसून येत आहे. .या समाजकंटकांवर वेळीच योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे.
दरम्यान मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आजुपासून फक्त उपोषणच नाही तर पाण्याचा एक थेंबही घेणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आता हे आंदोलन आणखीनच चिघळत जात असल्याचं दिसून येत आहे. या सगळ्या आंदोलनाचा फटका काही प्रमाणात चाकरमान्यांना देखील भोगावा लागत असल्याने मुंबई मनपा हद्दीतील कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.