Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : महाराष्ट्रातील साईनगरी म्हणून प्रसिद्ध असलेली शिर्डीमध्ये नियम वाढवले आहे. शिर्डीमधील साईबाबाचे मंदिर हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. मात्र आता साई संस्थानाने मंदिरांमध्ये मिळणाऱ्या मोफत प्रसादाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिर्डी संस्थानमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांना भोजन प्रसादासाठी आता कूपन घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. काही लोक दारू पिऊन प्रसादालयात येतात. धूम्रपान करतात. त्यामुळे तिथे प्रसाद घेणाऱ्या भाविकांना त्रास होतो. यामुळे साई संस्थानाने यापुढे जेवण व नाष्ट्यासाठी भाविकांना कूपन देण्याची सोय ठेवली आहे.
06 Feb 2025 06:21 PM (IST)
पुण्यात आता रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला अडवून लुटण्याचा प्रयत्न केला असता, तरुणाने विरोध केल्यावर लोखंडी वस्तुने त्याच्या डोक्यात घाव घालून जखमी केल्याचा प्रकार विमाननगर येथे घडला आहे. प्रकाश दीपक थापा (वय ३०, रा. यशोदा नंदन सोसायटी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाच फेब्रुवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. तक्रारदार विमाननगर परिसरातील यशोदानंदन सोसायटी येथे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करतो आणि तेथेच राहायला आहे. कामानिमित्त तरुण सोसायटीच्या बाहेर गेला होता. त्यावेळी अज्ञात तरुणाने त्याला अडवले आणि “तुझ्याकडे जे जे आहे ते मला काढून दे,” असे बजावले. अज्ञात व्यक्ती तरुणाच्या खिसे तपासात असताना तरुणाने त्यास विरोध केला. त्या व्यक्तीने तरुणाच्या डोक्यामध्ये लोखंडी जड वस्तुने मारले. त्याने तरुणाला दुखापत केली. विमानतळ पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
06 Feb 2025 06:07 PM (IST)
धनंजय मुंडे यांच्या मुलाने वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले की, "मी शीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणे भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकले आहे. माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता. माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची. जो घरेलू हिंसाचार तिच्यासोबत झाला असा ती दावा करते तो घरेलु हिंसाचार खरे तर मी, माझी बहीण व माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा. माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक व मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला व माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितले कारण तिच्या मते तिचा व आमचा ( जन्मदाती आई असुनही) काहीही संबंध राहिला नव्हता. 2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्यानाट्या गोष्टी पसरवत असते, असे धनंजय मुंडेंच्या मुलाने लिहिले आहे.
06 Feb 2025 05:46 PM (IST)
दहिसर चेक नाका येथे केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो. त्यामुळे टोल ठेकेदारानी हमरस्त्यावरील दोन्ही बाजूने मुंबई कडे जाताना ३ रांगा व येताना २ रांगा (लेन ) या अवजड वाहनांचा टोल घेण्यासाठी चालू ठेवावेत. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज दहिसर चेक नाका परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मीरा -भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी,टोलचे ठेकेदार उपस्थित होते.
06 Feb 2025 05:17 PM (IST)
भारत आणि इंग्लंडच्या यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना नागपूरमध्ये सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता भारताला सामना जिंकण्यासाठी 249 धावांचे लक्ष्य गाठावे लागणार आहे.
06 Feb 2025 04:58 PM (IST)
राज्यसभेमध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेतून भारतामध्ये पाठवलेल्या लोकांबाबत माहिती दिली आहे. संसदेमध्ये एस. जयशंकर म्हणाले की, "परत पाठवले जात असलेल्या नागरिकांच्या सोईसाठी अन्न आणि इतर गरजांची काळजी घेतली जाते. आपत्कालिन परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवांचा देखील समावेश असतो. आवश्यकता असल्यास किंवा टॉयलेट ब्रेक दरम्यान स्थलांतरितांना बंधनातून मुक्त केले जाते. हे नियम चार्टर नागरी विमान तसेच लष्कराच्या विमानासाठी देखील लागू आहेत. अमेरिकेने ५ फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या उड्डाणादरम्यान देखील यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. डिपोर्टेशन केले जात असलेल्या भारतीय नागरिकांशी गैरवर्तवणूक होऊ नये यासाठी आपण अमेरिकेच्या सरकारबरोबर संपर्कात असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी संसदेत दिली आहे.
06 Feb 2025 04:30 PM (IST)
बीड हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड चर्चेत आला आहे. तर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले आहे. यामुळे करुणा मुंडे यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे ठरवले आहे. यानंतर आता करुणा मुंडे यांनी वाल्मिक कराडबाबत गंभीर आरोप केले आहेत. करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक कराडने मला मारहाण केली. मला चुकीचा स्पर्श केला. मला मारहाण झाली. तेव्हा मी डीजी आणि फडणवीस यांना अर्ज दिला होता. मला सीसीटीव्ही फुटेज द्या असं म्हटलं होतं. पण अजून दिले नाही. तर वाल्मिक कराडविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.
06 Feb 2025 03:24 PM (IST)
संत प्रेमानंद महाराज यांनी आपली रात्रीची पदयात्रा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. काही लोकांनी पदयात्रेला विरोध केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच या मार्गावर पडलेल्या वसाहतीतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी पदयात्रेच्या गोंगाटाचा निषेध केला होता. परिणामी आश्रमाने हा निर्णय घेतला आहे. तसेच प्रेमानंद महाराजांच्या तब्येतीचा देखील विचार करुन आश्रमाने ही परिक्रमा सध्या तरी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
06 Feb 2025 03:00 PM (IST)
बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटर केलेला आरोपी अक्षय शिंदे याच्या पालकांनी मोठा निर्णय घेतला आहे. अक्षयच्या पालकांनी आपल्याला केस लढायची नसल्याचे सांगितले आहे. आम्हाला आमच्या मुलाच्या एन्काऊंटर प्रकरणाची केस लढवायची नसल्याची भूमिका अक्षयच्या पालकांनी घेतली आहे. यांच्यावर कोणाचाही दबाव नाही. मात्र आम्हाला ही धावपळ आता जमत नाही असे म्हणत अक्षयच्या पालकांनी केस लढण्यास नकार दिला आहे. यावर आता उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्ट आता यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
06 Feb 2025 02:36 PM (IST)
मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवले आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांना करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश दिले आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट करुन करुणा मुंडेंचे अभिनंदन केले आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, "करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत" अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी केली आहे.
06 Feb 2025 02:10 PM (IST)
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे आता नाराजी सोडून कामाला लागले आहेत. भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी ठाकरे सरकारच्या सरकारच्या काळामध्ये सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. भुजबळ म्हणाले की, "सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भारत सरकारला पत्र लिहून अर्थिक मदत घेतली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांच्या कानी घातले आहे. कांद्यावरचं निर्यात मूल्य, शिवभोजन थाळी योजना अशा अनेक गोष्टींवर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. दोन लाख लोक शिवभोजन थाळी योजनेचा फायदा घेत आहेत, त्यामुळे ती बंद करु नये," अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
06 Feb 2025 01:47 PM (IST)
जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र यातील 1 हजार 478 पैकी केवळ 296 योजनांची कामे पूर्ण झालीस आहेत. 31 मार्च 2024 पर्यंत या योजनांची कामे पूर्ण करण्याची मुदत होती. जिल्ह्यात 1 हजाराहून अधिक पाणीपुरवठा योजनांची कामे प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील कामांची गती पाहता, अजून या वर्षात तरी अनेक गावांमध्ये 24 तास पाणीपुरवठा होणे कठीण दिसत आहे. यामुळे जळगावच्या पाणीपुरवठा सुविधेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
06 Feb 2025 01:19 PM (IST)
नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा पुष्पोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी हा निर्णय घेत पुष्पोत्सव रद्द केला आहे. नाशिकमध्ये येत्या 2026 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर निधीची बचत करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वर्षी राजीव गांधी भवनच्या प्रांगणात पुष्पोत्सव होतो. यंदा देखील सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान हा पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी 47 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने निधीची बचत व्हावी या उद्देशाने कार्यक्रम रद्द करण्यात आला. पुष्पोत्सव रद्द झाल्याने महापालिकेच्या प्रांगणातील मंडप काढण्याचे काम सुरू आहे.
06 Feb 2025 01:02 PM (IST)
क्रिकेटचे ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक असणारे द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून दीर्घकाळ आजारी असणाऱ्या द्वारकानाथ यांची प्राणज्योत आज मालवली असून क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईच्या लीलावती रूग्णालयामध्ये द्वारकानाथ यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. उत्तम लेखक आणि समीक्षक असणाऱ्या द्वारकानाथ यांच्या निधनामुळे क्रिकेट आणि समीक्षक विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे.
06 Feb 2025 12:43 PM (IST)
राज्याचे मंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामध्ये करुणा मुंडे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारामध्ये दोषी ठरवले आहे. करुणा मुंडे यांनी दरमहा 10 लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दिलासा दिल्यानंतर करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे.
06 Feb 2025 12:33 PM (IST)
दिल्लीमध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. मात्र संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी गोंधळ घातला आहे. अमेरिकन नागरिकत्व नाकारलेल्या प्रवाशांचं विमान भारतात दाखल झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. सकाळपासून सुरु झालेल्या या गोंधळातच लोकसभेचे कामकाज सुरू आहे. अर्थसंकल्पावर आज विविध पक्ष सभागृहात आपली मत मांडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडून खासदार सुप्रिया सुळे अर्थसंकल्पाबाबत मत मांडणार आहे. मात्र त्यापूर्वी स्थलांतरित भारतीयांना अमेरिकेने परत पाठवून दिल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
06 Feb 2025 12:18 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत अफगाण पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिले. मंगळवारी ( दि. 4 फेब्रुवारी 2025) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत होते. यादरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षांनी एका अफगाण पत्रकाराने देशात सुरू असलेला संघर्ष आणि तालिबानच्या भूमिकेबद्दल विचारले असता चिडून आणि अनादराने उत्तर दिले.
06 Feb 2025 12:17 PM (IST)
श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे (वय ३०) यांनी आपले जीवन संपवले. गुरुवारी (दि.05) त्यांनी देहूमधील सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली आहे. मात्र त्यांनी एकूण चार चिठ्ठ्या लिहिल्या असल्याचे समोर आले आहे. शिरीष महाराज मोरे यांनी आई,वडील, मित्र, होणारी पत्नी यांना लिहिलेल्या चिठ्य्या समोर आल्या आहेत. यातून त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येच्या निर्णयामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
06 Feb 2025 11:25 AM (IST)
मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची चाचपणी सुरु झाली आहे. पुण्यातील लाडक्या बहिणींकडील कारची येत्या सोमवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे चारचाकी आढळल्यास, त्यांचं नाव योजनेतून वगळलं जाणार आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 75 हजार बहिणींच्या घरात चारचाकी गाड्या आढळल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुण्यात ही तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलेकडे चारचाकी गाडी आढळले, तिचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात येईल.
06 Feb 2025 11:23 AM (IST)
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुती सरकारने या योजनेचे पैसे 1500 वरुन 2100 वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरु झाली आहे. त्यामुळे सर्व महिला वर्गाची चिंता वाढली आहे. यावरुन आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
06 Feb 2025 11:04 AM (IST)
प्रहार नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी लाडकी बहीण योजनेवरुन टीका केली आहे. ते म्हणाले की, "डायरेक्ट नेत्याच्या खिशातून पैसे न जाता बजेट मधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मत ओढण्याचा प्रयत्न झाला आहे. ही स्कीम लाडक्या बहिणींसाठी नव्हती, तर सत्तेत येण्यासाठी होती. सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणींची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले, तुम्ही (सरकारने) निकष न पाहता त्यांच्या खात्यात पैसे टाकले, मग आता म्हणता की त्या पात्र नाहीत. मग त्यांना पैसे द्यायच्या आधी पात्र ठरवायचं ना, पैसे दिल्यावर पात्र कसं ठरवायचं. हा क्राईम आहे, सरकारने गुन्हा केला आहे. सरकारने मतं घेतली, मात्र आता त्यांचे पैसे बंद करणार ही त्यांची फसवणूक आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे," असा घणाघात बच्चू कडू यांनी केला आहे.
06 Feb 2025 11:02 AM (IST)
गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नसलेला किंग कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याच्या आवडत्या फॉरमॅटमध्ये फॉर्ममध्ये परतू इच्छितो. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला इतिहास रचण्याची संधी असणार आहे. जर विराटने आज ९४ धावा केल्या तर तो सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रमही मोडू शकतो.
06 Feb 2025 11:01 AM (IST)
अलीकडेच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात, स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांनी ‘स्काय फोर्स’ अभिनेता वीर पहारिया विनोद केला, त्यानंतर काही लोकांनी त्यांना मारहाण देखील केली. या घटनेनंतर अभिनेत्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून माफीही मागितली. विनोदी कलाकारावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
06 Feb 2025 11:00 AM (IST)
सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची आणि शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांची मोठी गर्दी असते. आणि अशाचेवळी हा बिघाड झाल्याने सर्वच प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत- भिवपूरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत स्थानकाजवळ पेंटाग्राफ तुटल्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.