Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? (फोटो-सोशल मिडिया)
Latur District Budget 2026: शैक्षणिक व वैद्यकीय हब म्हणून ओळखला जाणारा लातूर जिल्हा विदर्भ, कर्नाटक व आंध्रप्रदेशच्या सीमाभागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यटन व औषधी संशोधनाच्या संभावनांकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याच्या पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’च पडल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. अनेक राष्ट्रीय महामार्ग लातूर जिल्ह्यातून जातात. मात्र या महामार्गावरील अनेक पुलांची उंची कमी असल्याने यंदाच्या अतिवृष्टीत राज्य मार्गांसह गावांतर्गत रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गावरील पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.
परिणामी अनेक वेळा वाहतूक पूर्णतः बंद करावी लागली. काही ठिकाणी पूरपाण्यात वाहून गेल्याने नागरिकांना जीवही गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पात महामार्गांसाठी तरतुदीची अपेक्षा होती. पुलांची उंची वाढवणे, पूरप्रवण ठिकाणी संरक्षक उपाययोजना करणे. याबाबत ठोस उल्लेख दिसत नाही. मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती लवकरच सुरू होणार असली, तरी त्यातून लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक नियोजन जाणवत नाही.
जिल्ह्यात औसा येथील किल्ला, उदगीरचा किल्ला, निलंगा व रेणापूर तालुक्यातील धार्मिक स्थळे अशी अनेक ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळे असूनही अर्थसंकल्पात पर्यटन विकासासाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच वडवळ नागनाथ येथील वनस्पती बेट हे वनौषधीसाठी देशविदेशात प्रसिद्ध असून दुर्धर आजारांवर उपचार व सशोधनासाठी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. मात्र या क्षेत्राच्या विकासासाठीही अर्थसंकल्पात कोणतीही ठोस योजना नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Union Budget 2026 : संसदेचे वातावरण तापणार! अर्थसंकल्पावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार
लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील कमी उंचीचे पूल असल्याने पूर व अपघातांचा धोका कायम असतो. त्यामुळे अतिवृष्टीत वारंवार वाहतूक बंद करावी लागते. कधी जीवितहानीची घटनाही होते. मात्र, यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळांसाठी स्वतंत्र तरतूद नाही. वडवळ नागनाथ वनौषधी बेटाच्या संशोधन व विकासासाठी योजना नाही. शैक्षणिक वैद्यकीय हब असूनही भविष्योन्मुख आर्थिक नियोजनाचा अभाव असल्याने मुलांचे नुकसान होत आहे. या सगळ्या गोष्टींना दुर्लक्षित केल्याने लातूरचा विकास खुंटला आहे.






