शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग व आयपीओमध्ये ५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत एका खासगी कंपनीतील संगणक अभियंत्या तरुणाची तब्बल ४३ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार ५ डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान घडला. मोहन शर्मासह अन्य मोबाईलधारक अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन गजानन देशमुख (वय २८, रा. उत्तमनगर, जवाहर कॉलनी) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते पत्नी व मुलासह राहतात व घरून ऑनलाईन काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ५ डिसेंबर २०२५ रोजी देशमुख यांच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर एक लिंक आली. ती उघडताच त्यांना व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपचा ऍडमिन मोहन शर्मा होता. तो शेअर मार्केट ट्रेडिंगबाबत मार्गदर्शन करत होता. ग्रुपमध्ये दिलेल्या सूचनेनुसार ऍप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. किमान ५० हजार रुपयांची गुंतवणूक केल्याशिवाय ट्रेडिंग करता येणार नाही, असे सांगण्यात आले.
दरम्यान, आव्हाना या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्के नफा मिळेल, असे सांगण्यात आले. विश्वास बसल्याने फिर्यादी व त्यांच्या आईच्या बँक खात्यांतून वेगवेगळ्या तारखांना, वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर दिलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. यामध्ये येस बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, ऍक्सिस बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र येथील खात्यांचा वापर करण्यात आला. सिकंदर इंटरप्रायझेस, क्राफ्ट सिकार्ट सेलिफाय प्रा. लि., माँ श्री कामख्या इंटरप्रायझेस आणि जे. एन. ट्रेडिंग कंपनी या नावांनी खाते देण्यात आले होते.
बनावट नफा दाखवून घातला गंडा
२१ जानेवारी रोजी WAR-BURG ऍपमध्ये फिर्यादींना तब्बल ७८ लाख ७९ हजार ३१४ रुपयांचा नफा दिसू लागला. मात्र, आयपीओमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताच, ऍपवर पेडिंग आयपीओ ऑर्डर पे ६५ लाख ६४ हजार ३४० रुपये असा संदेश दिसून आला. ही रक्कम नव्याने भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेदेखील वाचा : Vikram Bhatt Fraud News: विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर फसवणुकीचा आरोप, पोलिस तक्रार दाखल; काय आहे संपूर्ण प्रकरण?






