वाळूज येथील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; खिडक्या-दरवाजे क्षणात उडाले (संग्रहित फोटो)
छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथील एका फार्मा कंपनीत भीषण आग लागून दुर्घटना घडली होती. त्यानंतर आता वाळूज औद्योगिक वसाहतीतील सुप्रीम सिलिकॉन्स या केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी झालेल्या स्फोटानंतर कंपनीत असलेल्या केमिकलमुळे मोठी आग लागली. स्फोट इतका मोठा होता की, कंपनीतील सर्व खिडक्या आणि दरवाजे तुटून उडाले. या आगीत दोन कामगार गंभीररित्या भाजले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे चार बंब आणि १५ टँकरने पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. या आगीत कच्चा, तयार झालेला माल व मशिनरीसह कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील अभिजित सुर्यवशी व अभिजित गोस्वामी यांची वाळूज औद्योगिक वसाहतीत सेक्टर एच -55 पेथे सुप्रीम सिलिकॉन्स नावाची कंपनी आहे.
या कंपनीत मोठ्या वाहनांच्या टायर मोल्डिंगसाठी लागणारे पॉलिमर तयार करण्याचे काम केले जाते. उत्पादित झालेला माल मराठवाड्यासह खान्देश व आसपासच्या विभागात पाठवला जातो. कंपनीत जवळपास 20 कामगार एकाच शिफ्ट मध्ये काम करतात. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास केमिकलसाठी लागणारे पाणी गरम करत असताना अचानक एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे बाजूला असलेल्या केमिकलच्या इमारतीला आग लागल्याने आगीचा मोठा भडका उडला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन विभागाचे जवान दोन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने बजाज व गरवारे कंपनीचे दोन बंब व खाजगी पाण्याचे १२ ते १५ टँकर मागवण्यात आले. त्यानंतर तब्बल दोन ते तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.
कंपनीसमोर बघ्यांची गर्दी
ही आग लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच कंपनीसमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीच्या घटनेत जीवितहानी नाही झाली नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी दोन कामगार भाजले असल्याची चर्चा सुरु होती. या आगीत कंपनीतील तयार झालेला माल, कच्चामाल, मिक्सर, मशिनरी, केमिकल आणि इतर साहित्य जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
हेदेखील वाचा : चंद्रपुरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट; 12 झोपड्या आगीत जळून खाक, आधी आग लागली अन् नंतर…






