सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसविषयी केलेल्या वक्तव्यानंतर आता मंत्री दिपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. अजित पवार हे एक कार्यक्षम मंत्री असून त्यांच्या येण्याने महाराष्ट्राला लाभ झालेला आहे. राज्याच्या विकासाला गती देखील प्राप्त झाली आहे, असे केसरकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बाेलताना नमूद केले. राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय, पण बाहेर आल्यावर उलट्या होतात, असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावरुन आता दिपक केसरकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
पुण्यात मॉर्डन कॉलेज येथे रोजगार व स्वयंरोजगार महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री केसरकर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘महायुतीत काेणताही वाद नकाे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांना बोलावले असावे. कोणाच्याही वक्तव्याने महायुतीत प्रॉब्लेम नको हेच मुख्यमंत्री सांगत असतात आणि याचाच पालन आम्ही करत असतो. महायुतीच्या माध्यमातून राज्यात जी प्रगती सुरू आहे ती अशीच पुढे कायम ठेवायची आहे.’’
‘मालवण येथे भव्य पुतळा बसविला जाईल’
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काेसळल्याबाबत केसरकर म्हणाले की, ‘‘ छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा बसविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी एक दाेन बैठकाही घेतल्या आहेत. या बैठकीत अधिकारी आणि प्रसिद्ध शिल्पकारही उपस्थित हाेते. सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल, मालवण येथे भव्य आणइ दिव्य असा पुतळा बसविला जाईल.’’