परळीः राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीत ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून थोड्याच वेळात त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातानंतर स्वत: धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अपघात किरकोळ असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे.
[read_also content=”अजित पवारांविरोधात बो़ंबा मारणारे शिवराय अपमान प्रकरणी गप्प का? छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांबाबत राज्यात वाद नको – संजय राऊत https://www.navarashtra.com/maharashtra/why-are-those-who-threw-attack-against-ajit-pawar-silent-on-the-shivarai-insult-case-there-should-be-no-controversy-in-the-state-regarding-maharaj-sanjay-raut-359136.html”]
काय आहे धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट?
मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.
शरद पवारांनी रात्रीची गाडी न चालविण्याचा दिला होता सल्ला
मागील महिन्यात भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या अपघातानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या अपघाताबाबत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रात्री-अपरात्रीचा प्रवास सर्वांनी टाळायला हवा, पण मी स्वतः कधी त्याचं पालन करत नाही, याबद्दल घरातील नेहमी मला बोलतात. परंतु राजकीय जीवनात काम करताना लोकांशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही. मात्र सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी, त्यामुळं शक्यतो रात्रीचा प्रवास टाळायला हवा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होत.
अजित पवारांनी मुंडेंना दिला होता सल्ला
दरम्यान, गोरेंच्या अपघातानंतर विधानसभेत बोलताना अजित पवारांनी रात्री १२ ते ३ प्रवास करु नका असा सल्ला सभागृहात सगळ्यांना दिला होता. त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन सुनावलं होतं. त्याकडे मुंडेंनी दुर्लक्ष केलं आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंचा अपघात झाल्यानं, अजितदादांचा सल्ला मुंडेंनी ऐकायला हवा होता, अशी चर्चा सुरु आहे.