औरंगाबाद – बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात एका अल्पवयीन मुलाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. महाराणा प्रताप चौक, बजाजनगर येथील विविध नामांकित कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा त्रास नागरिकांना होत असल्याची लेखी तक्रार येथील अर्जुन आदमाणे, आशा खोबरे, प्रियांका देशमुख व या नागरिकांनी पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे केली. तक्रारीनंतर तात्काळ 2 फेब्रुवारी रोजी रात्री एका अल्पवयीन मुलास लोखंडी रॉड व दगडाने बेदम मारहाण करणाऱ्या ऋषभ बाविस्कर (18), आदित्य बाविस्कर (19), विशाल झगडे(20, तिघेही रा. त्रिमुर्ती चौक बजाजनगर) यांच्या विरोधात जखमी 17 वर्षीय मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालक व पोलिसांनी गांभीर्याने घ्यावे
दर चार-पाच दिवसात याठिकाणी एकदातरी किरकोळ किंवा रक्त निघेपर्यंत आमच्या सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर क्लासेसच्या मुलांची भांडणे होतात. अतिशय घाणेरड्या शिव्या आणि ठार मारण्याची, खून करण्याची भाषा ही मुले करतात. डोक्यात दगड मारून ठार मारण्याची धमकी देतात. विशेष म्हणजे हे सर्व मुलींच्या आणि शिक्षकांसमोर घाणेरड्या शिव्या देतात. याकडे स्थानिक पोलिसांनी व पालकांनी वेळीच लक्ष घातले नाही तर येणाऱ्या काळात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय घडले 2 फेब्रुवारी रोजी?
क्लासेस सुटल्यानंतर 17 वर्षीय मुलगा घरी जात होता. यावेळी किरकोळ कारणातून त्याला रस्त्यात अडवून तिघांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान आदित्य बाविस्करने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने व सिमेंटच्या गट्टुने मुलाच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केले. बघ्याची मोठी गर्दी जमली तरीसुद्धा मारहाण करणारे तिघेजण मुलाला मारहाण करत धमकावतच होते. अखेर डोक्यातुन अधिक रक्तस्त्राव होत असल्याचे बघून तिघांनी पळ काढला. हा सर्व प्रकार लगतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
पोलिस गुन्हा दाखल करून घेत नाहीत
घटनेनंतर पोलिसात गेलेल्या फिर्यादीची पोलिस तात्काळ नोंद करून न घेता त्यालाच आपसांत मिटवून घेण्याचा उलटा सल्ला देतात. त्यामुळेच असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संख्येत वाढ होत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली.






