संग्रहित फोटो
मंचर : मंचर तालुका आंबेगाव येथे एसटी बस स्थानकासाठी पाच नवीन एसटी बस मिळाल्या असून, पुढील महिन्यात अजून पाच बस मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. मंचर बस आगार आणि मंचर बस स्थानकासाठी मागेल ते मिळेल मात्र एसटी बस स्थानक सुंदर कसे राहील, याची काळजी घ्या, अशी सूचना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसटी प्रशासनाला शनिवार दिनांक 10 रोजी केली आहे.
मंचर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून मंचर एसटी आगारासाठी नवीन सुसज्ज पाच एसटी बस मिळाल्या असून, या एसटी बसचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विष्णू काका हिंगे पाटील , उद्योजकअजय घुले, प्रशांत बागल, भाजपाचे नेते संदीप बानखेले, भीमाशंकर चे संचालक मच्छिंद्र गावडे , खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सोपानराव नवले ,मुकुंद खुडे, सामाजिक कार्यकर्ते सुदाम बाळाजी पडवळ, लाला बँकेचे संचालक जे के थोरात, एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश घनराळे, मंचर एसटी आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी, मंचर बस स्थानक प्रमुख साधना कालेकर यांच्यासह एसटीचे चालक वाहक, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि प्रवासी उपस्थित होते.
यावेळी वळसे पाटील म्हणाले की, मंचर एसटी आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे उत्पन्नात वाढ होते. मात्र आंबेगाव तालुक्यातील कॉलेज, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला तसेच भीमाशंकर परिसरातील आदिवासी नागरिकांची गैरसोय होऊ नये. यासाठी मंचर एसटी आगाराला जास्तीत जास्त बस उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. मंचर बस आगार व्हावे, ही खूप दिवसापासूनची मागणी होती. ती दीड वर्षांपूर्वी मार्गी लागली. मात्र राजगुरुनगर, नारायणगाव आगार आपल्याला जवळ असल्याने मंचरला स्वतंत्र एसटी आगार मंजूर होत नव्हते. १२ ते १४ वर्षे कष्ट करून एस टी आगार मंजूर करून कार्यान्वित केले आहे. एसटी आगाराला कर्मचारी, एसटी गाड्या, डिझेलपंप, वर्कशॉप या सर्व गोष्टी मिळाव्या यासाठी देखील प्रयत्न केले आहेत. सर्व प्रवाशांना एसटी प्रशासनाने उत्तम सेवा द्यावी, अशी अपेक्षा वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
भविष्यात जूने झालेले मंचर बस स्थानक पाडून या ठिकाणी नवीन सुविधायुक्त बस स्थानक बांधा आणि हस्तांतर करा, या तत्त्वावर उभारण्याचा मानस आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मदत घेऊन चांगले एसटी बस स्थानक बांधण्यात येईल.
– दिलीप वळसे पाटील माजी मंत्री.