शक्तीपीठ महामार्ग (फोटो- istockphoto )
कोल्हापूर: जिल्हावासीयांची दिशाभूल करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी विकासाला विरोध करण्यापेक्षा पालकमंत्री, मंत्री, आमदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? याचे आत्मपरीक्षण करावे. थेट पाईपलाईनमधून अभ्यंगस्नान करण्यासाठी कोल्हापूर शहरवासीयांच्या किती दिवाळी खर्ची घातल्या. त्यानंतर स्वत: आंघोळ करून गळकी थेट पाईपलाईन योजना शहरवासीयांच्या माथी मारली, याकडे लक्ष द्यावे, असा उपहासात्मक टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.
विरोधाला विरोध करण्याचे काम होत असल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. अशा प्रकारचे प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे असताना यासही राजकीय स्वार्थापोटी विरोध केला जात आहे. सद्या माजी पालकमंत्री यांच्याकडे महायुतीला विरोध करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम शिल्लक नाही. छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय आहे. पण, त्याचे श्रेय मिळत नाही म्हणून शक्तीपीठ महामार्गाला याचे कारण बनविले जात आहे. शक्तीपीठ महामार्ग हा निवडणुकीचा मुद्दा नसून विकासाचा मुद्दा आहे.
हा राजकीय विषय असता तर महायुतीचे दहा पैकी दहा उमेदवार निवडणून आले असते काय? महायुतीचा विजय हा जनतेचा विजय आहे. त्याला शक्तीपीठ महामार्गाचे वळण लावून शेतकरी बांधवांची आणि संपूर्ण जिल्हावासीयांची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. शक्तीपीठ महामार्ग हा महायुती शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असून जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच यावर मी आजही ठाम आहे.
आमदार सतेज पाटील यांच्याकडे मंत्री पद, पालकमंत्री पद होते. महापालिकेत त्यांची सत्ता होती पण त्यांनी शहरासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. ते सद्या विधानपरिषद सदस्य असून त्यांना महापालिकेत बैठक घेण्याचा अधिकार आहे त्यांनी बैठक घेवून त्यांनी केलेल्या कामाची आणि राज्य नियोजन मंडळाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा तपासावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मी कन्व्हेन्शन सेंटर, रंकाळा तलाव, गांधी मैदान, रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. कोल्हापूर सांगली पूरस्थिती नियंत्रणासाठी ३२०० कोटींचा प्रकल्प आणला आहे.
Shaktipeeth ExpressWay: शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला; तब्बल 12 हजार शेतकरी उचलणार ‘हे’ पाऊल
आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी कोट्यावधी रुपयांचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याउलट त्यांनी विकासाचे काय काम केले जाहीर करावे. सद्या लोकांना विकास हवा असून, त्यांची दिशाभूल करण्याचे करू नये. जे विरोधकांच्या व्यासपीठावर आहेत ते बाधित नाहीतच पण जे आमच्या बाजूने आहेत ते खरे बाधित शेतकरी आहेत ते शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आहेत. येत्या काळात शक्तीपीठ महामार्ग समर्थकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल, असेही त्यांनी याद्वारे सांगितले आहे.