File Photo : Farmers
अमरावती : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच पसंतीस उतरली आहे. महिलांचा या योजनेला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यानंतर आता शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. तसेच लाडकी बहिणी योजनेच्या धर्तीवर लाडका शेतकरी योजनाही सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे.
हेदेखील वाचा : आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं ऐकत नाही आणि इथे सरकारला वाटतंय 1500 रुपयांत त्यांचं ऐकेल… चिमुकलीचा Video Viral
आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. सततच्या पावसाने त्रस्त झालेले धारणी, चिखलदरा, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यातील गावागावातील नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. यावेळी या संततधार पावसाने जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे व शेतात पाणी साठले आहे.
सण उत्सावांच्या दिवसांत आपण कसे जगावे हा प्रश्न बळीराजापुढे निर्माण झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सरकारने ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी यावेळी केली.
लाडका शेतकरी योजना सुरु करावी
शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ‘लाडका शेतकरी’ योजना सुरू करावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली. शेतकऱ्यांनी धीर धरावा, खचून जाऊ नये, सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांना देऊन राणा यांनी मदत मिळवून देण्याचे अभिवचन दिले.
हेदेखील वाचा : आधी ‘लाडकी बहीण योजने’ला विरोध! निवडणूक जवळ येताच काँग्रेसने दिले ‘हे’ मोठे आश्वासन