पुणे : कसबा (Kasba Peth Bypoll) विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल नुकतेच समोर आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला. त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्षाचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत भाष्य केले. ‘ठाकरे कुटुंब पूर्वीपासून माझ्या जवळचं आहे. आजही राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत’, असे धंगेकर म्हणाले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यामध्ये भाजपचा पराभव करत धंगेकर विजयी झाले. त्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘शिवसेनेत असताना दीपक पायगुडे यांच्यामुळे राज ठाकरेंकडे आकर्षित झालो. 10 वर्षे मनसेत नगरसेवक म्हणून काम केलं. पण, 2019 ला काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही राज ठाकरेंशी संवाद ठेवला.
राज ठाकरेंबद्दल आदर
राज ठाकरेंबद्दल आदर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सर्वांच्या हाताखाली काम केलं आहे. ठाकरे कुटुंब पूर्वीपासून माझ्या जवळचं आहे. आजही राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. शिवसेना आणि मनसे सोडली, पण त्यांच्यावर कधीही टीका केली नाही. कारण कुटुंब म्हणून त्या परिवारात राहत होतो, असेही त्यांनी सांगितले.
विजयानंतर राज ठाकरेंचा फोन आला का?
भाजप उमेदवाराचा पराभव करून धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी राज ठाकरेंशी चांगले संबंध असल्याचे म्हटल्यानंतर त्यांना राज ठाकरेंकडून फोन आला होता असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटले की, ‘राज ठाकरेंचा फोन आला नाही. पण, त्यांना भेटण्यास जाणार आहे’.