आमदार सुनील शेळके (फोटो- सोशल मीडिया)
लेडीज डान्सबार बंद करण्यासाठी नागपूर अधिवेशनात लक्षवेधी
नवराष्ट्रच्या बातमीची आमदार सुनील शेळके यांनी घेतली दखल
डान्सबारमुळे निर्माण झाला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
Sunil Shelke : मावळ तालुक्यातील विविध भागांत खुलेआम सुरू असलेल्या लेडीज डान्सबारमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून समाजावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होत असल्याची बाब दैनिक ‘नवराष्ट्र’मध्ये सविस्तरपणे प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली आहे.
आमदार शेळके यांनी सभागृहात सांगितले की, राज्यात लेडीज डान्सबारला बंदी असूनही मावळ तालुक्यात जोमात लेडीज डान्सबार सुरू असून त्याठिकाणी दररोज लाखो रुपयांची उधळपट्टी होत आहे. यामुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागत असून महिला आणि कुटुंब व्यवस्थेवरही याचे गंभीर परिणाम होत आहेत. तसेच अशा ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, पोलिस व संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून बेकायदेशीर लेडीज डान्सबार बंद करावेत, तसेच अशा प्रकारांना संरक्षण देणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आमदार सुनील शेळके यांनी लक्षवेधीद्वारे केली.
दैनिक नवराष्ट्रने केलेल्या या वृत्तांकनामुळे स्थानिक पातळीवर जनजागृती झाली असून नागरिकांकडूनही अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आता शासन आणि गृह विभाग या प्रकरणात कोणते ठोस निर्णय घेतात, याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.






