संग्रहित फोटो
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. सर्व राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्व राजकीय पक्षाच्या नेते नागरिकांच्या भेटीही घेत आहेत. अशातच आता बावधन-कोथरूड प्रभागातील मतदार याद्यांमध्ये तब्बल बाराशेहून अधिक मतदारांची नावे दुबार असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस बाळा शेडगे यांनी केला आहे. पक्षाच्या वतीने मतदार यादीची पडताळणी केल्यानंतर ही माहिती समोर आली असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन दुबार नावे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती शेडगे यांनी दिली.
शेडगे यांनी सांगितले, बावधन-कोथरूड प्रभागात एकूण १,१५८ मतदारांची नावे दोन ते तीन वेळा यादीत आढळली आहेत. काही प्रकरणांमध्ये मतदाराचे नाव, फोटो आणि ओळखपत्र क्रमांक एकसारखे असून, पत्त्यात केवळ लहान बदल करून वेगवेगळ्या मतदारसंघात नाव नोंदवले गेले आहे. या नोंदींमध्ये एका सनदी अधिकाऱ्याचे नावही दुबार असल्याचे आढळले.
शेडगे पुढे म्हणाले, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पडताळणी करताना आम्ही सारखी नावे आणि फोटो ओळखले. मात्र, दुबार नावे वारंवार मतदानावेळी समस्यांना कारणीभूत ठरतात. प्रत्येक निवडणुकीत तक्रारी नोंदवल्या जातात, पण त्या निवारणाविना राहतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ही दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे कामगार सेना उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, कोथरूड विभाग सचिव राजेंद्र वेडे पाटील, शहर संघटक प्रशांत मते, शहर सचिव संजय भोसले, उपविभाग अध्यक्ष महेश लाड आणि रमेश जाधव उपस्थित होते.