डोंबिवली-अमजद खान : डोंबिवली आणि ठाण्याला जोडणारा मोठा गाव माणकोली खाडी पूल तयार करण्यात आला आहे. मात्र श्रेयवादामुळे हा पूल जनतेच्या प्रवासाकरीता खुला केला जात नाही. जनतेच्या प्रवासात श्रेयवादाचा खोडा असल्याचे ट्वीट मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. मनसे आमदार यांनी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही हेच ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटची दखल घेऊन मुख्यमत्र्यांकडून आतातरी या पूलाचे लोकार्पण होणार की नाही याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
मोठा गाव माणकोली खाडी पूल हा डोंबिवली आणि ठाणे शहरांना जोडणारा आहे. अवघ्या १५ मिनिटात डोंबिवतीलून ठाणे गाठता येणार आहे. या पूलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या पूलाचे लोकार्पण केले जात नाही. या पूलाच्या लाोकार्पणकरता शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा आहे. दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. त्यांच्याकडून श्रेयवादासाठी पूलाचे लोकार्पण रखडवून ठेवण्यात आल्याचा स्पष्ट आरोपच मनसे आमदार पाटील यांनी ट्वीटद्वारे केला आहे. मनसे आमदार पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पूल जनतेसाठी बांधला होता की, श्रेयासाठी? असा सवाल उपस्थित केला आहे. माणकोली पूलाचे श्रेय बळकावण्यासाठी दोन्ही सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार होड सुरु आहे.
राज साहेब म्हणतात तेच खरं आहे. जनतेला राग येत नाही. म्हणून हे सत्ताधारी जनतेला वेठीस धरतात. शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमत्री आणि अन्य मंत्री डोंबिवलीत येणार आहेत. तर पूल नागरीकांना खुला करुन जनतेची ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका तरी करा. ज्यांना श्रेय घ्यायचे आहे. त्यांनी घेऊन टाका आणि कृपया आता तरी जनतेला गृहित धरणं सोडा असा टोला पाटील यांनी लगावला आहे. पाटील यांनी केलेल्या ट्वीटमुळे पूलाचे रखडलेले लोकार्पण होणार का तसेच शासन आपल्या दारी या कार्यक्रमास मुख्यमंत्री आल्यावर ते याविषयी काय बोलतात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.