कल्याण (अमजद खान) : रेल्वे प्रशासनाकडून उपनगरीय गाड्यात अधिकृत फेरीवाल्यांना व्यावसाय करण्याची परवानगी दिली जाण्याच्या हालचाली सुरु आहेत. रेल्वेच्या गाड्या कमी आहेत. प्रवाशांना सकाळ संध्याकाळ धक्के खात लोंबकळत प्रवास करावा लागतो. गाडीत प्रवाशांना पाय ठेवण्यासाठी जागा नसते. अशात अधिकृत फेरीवाल्यांना परवानगी देणे म्हणजे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. रेल्वेने असा काही निर्णय घेण्याचा विचार देखील करु नये अन्यथा मनसे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
रेल्वे स्टेशन परिसराच्या हद्दीतील फेरीवाले हटविण्याची मागणी मनसेच्या वतीने वारंवार केली जाते. ठिकठिकाणी रेल्वे हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले हटविण्याकरीता मनसे आंदोलनेही केली आहेत. मात्र रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्याच्या कारवाईबाबत रेल्वे आणि स्थानिक स्वराज्य संस्था एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होते. या फेरीवाल्यांना पोसण्यात रेल्वे आणि महापालिकेचे अधिकारी हप्ते घेतात. या हप्तेखोरीवरच फेरीवाला पोसला जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली जात नाहीत. स्टेशनमध्ये उतरलेला प्रवासी धड स्टेशनातून बाहेर पडू शकत नाही. अशा परिस्थिती रेल्वेकडून अधिकृत फेरीवाल्यांना उपनगरीय गाड्यात व्यावसाय करण्याची परवानगी देणे म्हणजे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम रेल्वे कडून केले जाणार आहे. गर्दीत प्रवास करणे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यात फेरीवाल्यांना परवानगी दिल्यावर सगळेच आलबेल होईल. अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाला हे कोण ठरविणार. त्यापेक्षा अधिकृत फेरीवाल्यालाही परवानगी नको असे मनसेचे म्हणणे आहे. रेल्वेने मनसेची मागणी विचारात न घेता प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे आमदार पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संंस्था या प्रवासी संघटनेच्या वतीने अधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे उपनगरीय गाड्यात व्यावसायाकरीता परवानगी देण्यास विरोध केला आहे. प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांनी सांगितले की, आमचा विरोध आहे. रेल्वे प्रशासनाने परवानगी देणे हे प्रवाशांसह रेल्वे प्रशासनाला त्रासदायक ठरणार आहे. असा कोणताही निर्णय रेल्वेने घेऊ नये. प्रवाशांवर अशी वेळ आणू नका की प्रवाशांना आंदोलन करावे लागेल.
प्रवासी संघटनेचे पदाधिकारी राजेश घनघाव यांनी सांगितले की, रेल्वे असा काही निर्णय घेणार असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. त्याला सर्व प्रवासी संघटनांचा विरोध राहणार आहे. वेळ प्रसंगी प्रवासी रेल्वेच्या आंदोलन करतील, हे प्रशासनाने लक्षात ठेवावे .