मराठी अस्मितेसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मीरा भाईंदर मोर्चाला अखेर पोलिसांची परवानगी मिळाली (फोटो - सोशल मीडिया)
Mira Bhayandar MNS Morcha : मुंबई : मीरा भाईंदर रस्त्यावर मागील दोन ते तीन तासांपासून जोरदार राडा सुरु होता. मीरा भाईंदरमधील व्यावसायिकांनी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध हिंदी असा वाद चिघळला होता. महाराष्ट्रामधील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्यावरुन हा वाद सुरु झाला होता. याबाबत शासन आदेश रद्द करण्यात आल्यानंतर देखील हिंदी भाषिकांनी केलेल्या वक्तव्यानंतर वादाची ठिणगी पडली. मीरा भाईंदर येथे ठाकरे गट आणि मनसेचा एकत्रित मोर्चा होणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर दोन तासांनंतर परवानगीनंतर हा मोर्चा सुरु झाला आहे.
मराठी भाषिकांबाबत आणि भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे मीरा भाईंदर रोड येथे मोर्चा काढणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. या रस्त्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. संघर्षमय ठिकाणाहून मनसे मोर्चा घेऊन जाण्यासाठी अडून राहिल्याने पोलिसांनी परवानगी दिली नाही अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यानंतर आक्रमक आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. तसेच आक्रमक आंदोलकांना ताब्यात घेत ठिय्या करणाऱ्या आंदोलकांना देखील ताब्यात घेतले. त्याचबरोबर पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मोर्चाच्या ठिकाणी पोलिसांनी कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेल्या लोकांना देखील ताब्यात घेतले असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच पोस्टरबाजी आणि घोषणाबाजी करणाऱ्यांना देखील रोखण्यात आले. पोलिसांनी परवानगी देत नाही तोपर्यंत इथेच ठिय्या करण्याचा पवित्रा मनसे –शिवसेना पक्षाने घेत
ल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली होती. याच पार्श्वभूमीवर अखेर मुंबई पोलिसांनी मनसे-ठाकरे गटाच्या या मोर्चाला परवानगी दिली आहे. ठरलेल्या मार्गावरुनच मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी हजारो मराठी तरुण-तरुणी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर लहान मुले आणि वृद्धांचा देखील समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये देखील चिमुरडी मुले सहभागी झाली आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तीन जुलै रोजी याच चौकातून मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर मराठी एकजूट दाखवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले त्याला परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांनी अनेकांना अटक करत जमावबंदीचा आदेश लागू केला. सोमवारी रात्रीपासूनच ओम शांती चौकाला छावणीचे स्वरुप आले आहे. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले.
सरकार घाबरलं आणि मोर्चाला परवानगी दिली
मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले की, “प्रशासनाने, सरकारने हा मोर्चा येऊ नये यासाठी प्रयत्न केला. पोलिसी बळाचा वापर केला. दडपशाही केली. तरीही मराठी माणूस वाकला नाही हे पाहून ते झुकले. मोर्चाला परवानगी दिली गेली. एखादा आमदार मेहता आहे म्हणून काय फक्त मेहता लोकांचाच आहे की काय? सामान्य लोकांचा नाहीये का? एखादा व्यापारी उठून म्हणतो की महाराष्ट्रात हिंदीच बोलणार, त्याला आमच्या लोकांनी प्रसाद दिला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलीस संरक्षण देऊन परवानगी दिली जाते. पण मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते? हा मराठी माणूस तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. ते घाबरले म्हणून मोर्चाला परवानगी दिली ” असा टोला त्यांनी लगावला आहे.