File Photo : Maharashtra Assembly
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (दि.27) सुरू होत आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांनी चांगली रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी आपली परंपरा कायम ठेवत पावसाळी अधिवेशनाआधी राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला.
विरोधकांकडून पत्रकार परिषदही घेण्यात आली होती. त्यामध्ये काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्यांवर टीका केली. ते म्हणाले, ‘राज्य सरकारकडून चहापानाचे निमंत्रण आम्हाला मिळाले. परंतु, ज्या नेतृत्वाने किंवा महायुतीच्या सरकारने या राज्याला संपूर्णत: खड्यात घालण्याचे काम केले आहे. अभद्र युती ज्याला आपण अनैतिक संघत बोलता या राज्यामध्ये पाहायला मिळत आहे’.
तसेच लोकसभेच्या निवडणुकीत या सरकारवरील राज्यातील असेल किंवा केंद्रातील ज्यांची फुगलेल्या छातीतील हवा काढण्याचे काम महाराष्ट्रातील मतदारांनी केले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. ‘चौदाव्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. जनाधार गमावलेल्या या सरकारने 145 जागा जिंकण्याच्या फार मोठ्या वल्गना केल्या. पण तिन्ही पक्षांची अवस्था सर्व महाराष्ट्राने पाहिली’, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला
लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून, अनेकविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठकांचा सत्र सुरू झाले आहे. यातच विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. या निवडणुकीत मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.