संग्रहित फोटो
मुंबई : महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यातील विविध जिल्ह्यांत वज्रमूठ सभा (Vajramuth Sabha) घेतली जात आहे. त्यानुसार, नागपूरात 16 एप्रिलला महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होत आहे. ही सभा ज्या दर्शन कॉलोनी मैदानावर होणार आहे. त्या ठिकाणाला भाजपच्या स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे. या विरोधानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाष्य केले. ‘गर्दीचा अंदाज आल्यानेच अनेकांच्या पोटात गोळा उठला’, असे त्यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे ज्या ठिकाणी सभा होणार आहे. त्या ठिकाणचे स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी याला विरोध केला आहे. ‘हे खेळाचे मैदान आहे. त्यामुळे याठिकाणी राजकीय सभा होऊ नये’, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभास्थळाला विरोध नसल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यानंतर यावर अरविंद सावंत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘संभाजीनगरपेक्षा नागपूरला महाविकास आघाडीची जबरदस्त सभा होणार आहे. लाखोंच्या संख्येने गर्दी होणार आहे. यात कुठलीही शंका नाही. अद्याप आमचे जागावाटप ठरले नसले तरी विदर्भात आम्ही गतवैभव मिळवू. सभेचा, गर्दीचा अंदाज आल्यानेच अनेकांच्या पोटात गोळा उठला’, असेही त्यांनी म्हटले आहे.
सभेसाठी रितसर परवानगी : अनिल देशमुख
नागपूरमध्ये ज्या मैदानात सभा होत आहे त्या मैदानाची क्षमता मोठी आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पाहणी करून सभेसाठी मैदान निश्चित केले. सभेसाठी रितसर परवानगी घेण्यात आली आहे. पहिली वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या सभेतील गर्दीचा धसका भाजपने घेतला आहे. त्यामुळे भाजप काही लोकांना पुढे करून विरोध करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.