शिवसेना वर्धापन दिनात बोलताना खासदार श्रीकांत शिंदे (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई: आज मुंबईच्या वरळी येथे शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन सोहळा पर पडला. या सोहळ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. नुकताच भारताच्या शिष्टमंडळाने ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी जगभरातील देशांचा दौरा केला होता. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे. टीका करणाऱ्याना देखील त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
जगभरातील देशांना पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्याबद्दल आणि भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेले सडेतोड प्रत्युत्तर याबाबत माहिती देण्याची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे आणि अन्य सदस्यांची होती. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “हे शिष्टमंडळ तयार झाले तेव्हा यामध्ये अनेक अनुभवी लोक होते. अनुभवी लोकांमध्ये एका तरुण चेहऱ्याला संधी देणे, त्यांना पुढे आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.”
तुम्ही जगभरात ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी गेले असता, तुम्हाला साधे कुणी भेटायला देखील आले नाही, अशी टीका भारतातील काही राजकारणी मंडळींनी केली. त्याबाबत प्रश्न विचारला असता, खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, “इथे बसून कोणाला टीका करायची आहे त्यांनी ती टीका केलेली आहे. मात्र भारताला, 140 कोटी देशवासियांना जो संदेश जगाला द्यायचा होता, ते काम आम्ही केले आहे. जे लोक गल्लीमध्ये बसून बरळत आहेत त्यांना, बरळूद्या. आम्हाला जे काय करायचे होते ते आम्ही करून आलो आहे.”
“जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी हल्ले बंद करणार नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. जर पाकिस्तानने पुन्हा भारतावर दशतवाडी हल्ले केले तर भारत असेच चोख प्रत्युत्तर देईल, हे आम्ही जगाला सांगितले आहे,” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.