मोठी बातमी ! MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली; आता 5 एप्रिल ते 2 मेदरम्यान होणार परीक्षा (फोटो - istock)
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ पुढे ढकलण्यात आली आहे. पूर्व परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी कमी वेळ मिळत असल्याची दखल घेत आयोगाने गुरुवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले.
आयोगाच्या पूर्वीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार ही मुख्य परीक्षा २९ मार्च ते २६ एप्रिल या कालावधीत होणार होती. मात्र, सुधारित वेळापत्रकानुसार आता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ ही परीक्षा ५ एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत घेतली जाणार असल्याचे आयोगाचे उपसचिव (जाहिरात) सं. पां. देशमुख यांनी शुद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
हेदेखील वाचा : MPSC News: ‘एमपीएससी’ला मिळाले नवीन अध्यक्ष; विवेक भिमनवर यांची नियुक्ती
आयोगाने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली होती. मात्र, या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी सुमारे १०५ दिवसांचा कालावधी लागला. निकाल उशिरा लागल्याने २९ मार्चपासून नियोजित असलेल्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांकडे अवघे ३० दिवसांचा कालावधी उरला होता. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आयोगाकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख आता ६ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.






