फोटो सौजन्य - Social Media
आदिवासी भागात राहणारा हा तरुण एका दुर्गम भागातून अतिशय गरीब कुटुंबातून येतो. या भागात ना कसल्या सुविधा, ना काही! देशात या भागाला नक्षल भाग म्हणून ओळखला जातो. त्यात घरची परिस्थितीही बेताची होती म्हणून वडिलांनी हेमकृष्णला नोकरीला जाण्याचा आदेश दिला. आई-वडील तसे साधे शेतकरी पण हेमकृष्णांचे स्वप्न काही तरी मोठे करण्याचे होते पण त्याने बाबांचे शब्द पाळले आणि मुंबईत कामगार अधिकारी म्हणून नोकरी केली. त्यांनतर त्याने तहसीलदारपदी नियुक्ती मिळवली. पण देशासाठी काही तरी करण्याचे स्वप्न त्याला शांत बसू देत नव्हते. त्याने UPSC ची तयारी सुरु केली.
अमरावतीमध्ये नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्याने UPSC च्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली आणि अतिशय परिश्रमाने यंदाच्या निकालात AIR 839 रँक मिळवली. त्याने त्याच्या यशावर एक भाष्यही केले आहे. त्याचे म्हणणे आहे की, “दुर्गम भागात राहत असूनही मोठ्या जिद्दीने अभ्यास केला तर यश नक्की मिळते, हा विश्वास आज सार्थ ठरला. माझ्या यशाचे खरे श्रेय माझ्या पालकांना आणि शिक्षकांना जाते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी जिद्द आणि आत्मविश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केले, तर निश्चितच यश मिळते.”
गरीब शेतकरी घरात आणि आदिवासी भागात जन्मलेला हा पठ्ठ्या, पुढे पुण्यात उच्च शिक्षण घेतो. चारवेळा MPSC च्या परीक्षा उत्तीर्ण करतो आणि शेवटी नायब तहसीलदार असून देशसेवेची वेडापायी AIR 839 रँकने UPSC सारखी कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करतो, खरंच हेमकृष्ण पिसदे, तरुणाईसाठी एक आदर्श ठरतोय.






