आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त MTDC कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत (फोटो सौजन्य-X)
Womens Day 2025 In Marathi: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. “आई” महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
याप्रकरणी पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, एमटीडीसीने महिलांसाठी समर्पित ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण अंमलात आणले आहे. महिला पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. २०२४ मध्ये एमटीडीसीच्या महिला दिन विशेष सवलतीला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. १५०० हून अधिक महिला पर्यटकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळे सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, २०२५ मध्येही ही योजना राबवण्यात येणार आहे.महिला पर्यटक www.mtdc.co या संकेतस्थळावर जाऊन सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले की, पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महिला पर्यटकांसाठी हा विशेष उपक्रम आहे एमटीडीसीची नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि खारघर (नवी मुंबई) येथील महिला-संचालित पर्यटक निवास पूर्णतः महिलांद्वारे संचलित केली जातात. यामध्ये रिसॉर्ट व्यवस्थापन, सुरक्षा, टॅक्सी सेवा, स्वच्छता, हॉटेलिंग आदी सर्व जबाबदाऱ्या महिलांकडेच आहेत. यामुळे महिलांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
१ ते ८ मार्च २०२५ आणि वर्षभरातील इतर २२ दिवस असे एकूण ३० दिवस ५० टक्के सवलत असून या २२ दिवसांची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार. एमटीडीसी च्या पर्यटन स्थळांवर महिला बचत गटांसाठी स्टॉल्सची सुविधा दिली जाईल. महिला पर्यटकांसाठी विशेष साहसी आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. हेरिटेज वॉक, साहसी पर्यटन, शैक्षणिक सहली आणि पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण. महिला गाइड्स आणि जल पर्यटन प्रशिक्षकांना संधी दिली जाईल. महिलांसाठी विशेष खेळ आणि मनोरंजन उपक्रम देखील असतील.
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी स्पष्ट केले की, “महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि अनुकूल पर्यटन वातावरण निर्माण करणे हा एमटीडीसीचा मुख्य उद्देश आहे. ‘आई’ धोरणामुळे महिला प्रवाशांना अधिक संधी आणि प्रोत्साहन मिळेल.
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले की, ८ मार्च हा सुट्टीचा दिवस असल्याने महिला पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडतील. त्यामुळे हा उपक्रम महिलांसाठी पर्वणी ठरेल. महिला पर्यटकांसाठी एमटीडीसीतर्फे महिलांसाठी ही एक खास संधी आहे. सवलतीसह पर्यटनाचा आनंद नक्की घ्या. ही पर्वणी चुकवू नका! १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाइन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन विभागातर्फे करण्यात आले आहे.