मुंबई: वातावरणात डोकावू लागलेला थोडासा गारवा, झुंजुमुंजू उजेडात काजवे चमकावे तसे वाहनांचे चकाकणारे दिवे… रात्रभराच्या जागरणाचा शीण घालविण्यासाठी नुकतेच निमालेल्या पणत्या आणि मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांच्या निरागस सुरांमध्ये उजाडणारी धनत्रयोदशी. दिपोत्सवाच्या पहाटे आज चिंब सुरांमध्ये भिजण्याची, मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांमध्येे अभ्यंगस्नानाची अनुभूती घेतली ती मुंबईकर रसिकांनी. निमित्त होते ‘नवराष्ट्र’च्या दिवाळी पहाटचे.
धनत्रयोदशीच्या पहाटे माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिरात रंगला तो ‘नवराष्ट्र’चा स्वर दिपावली हा कार्यक्रम; ‘सूर निरागस हो…’चा आलाप प्रथमेश लघाटेने घेतला आणि रसिकांच्या मनावर त्याने पकड घेतली. पाठोपाठ मुग्धा वैशंपायन हिने एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. प्रथमेशने गाण्याच्या विविध प्रकारांमध्ये लिलया मुशाफिरी करत रसिकांची दाद मिळवली. मुग्धा आणि प्रथमेशच्या द्वंद गीतांनीही बहर आणली. रसिकांना आपलेसे करणाऱ्या या जोडीच्या अनेक ताना, हरकती, मुरक्यांवर प्रेक्षागृहातून उत्स्फूर्त दाद मिळाली. मधुमास नवा, कळीदार कापूर, गालावर खळी, हे सुरांनो चंद्र व्हा, मी राधिका या गीतांनी तर रसिकांना खिळवून ठेवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवभारत वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष ए. श्रीनिवास, अवधुत साठे अॅकेडमीचे प्रसाद परुळेकर व मंदार रेगे, झीब्रो ग्रुपचे आशिष गडकरी, डॉ. गौरी चव्हाण आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. देवांगी आऊटडोअर ऍडव्हर्टायझिंग, एचसीजीचे निखिल कुलकर्णी, सुपर्ब ग्रुप, लूम्स एन विवच्या अश्विनीं पै यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाची साथ दिली. या आयोजनात मराठी संवर्धन मंडळाच्या सुप्रीया दरेकर व साई दरेकर, स्वर समर्थच्या प्रिती मांडके यांनी महत्वाची भूमिका बजावली. मयुरेश साठे यांनी या बहारदार कार्यक्रमाचे रंगतदार निवेदन केले.
निवेदिता सराफ यांची उपस्थिती
केवळ मराठीच नव्हे तर हिंदी फिल्म जगतातही आपली ओळख निर्माण करणाऱ्या निवेदिता सराफ यांनी ‘नवराष्ट्र’च्या सूर दिपावली कार्यक्रमात उपस्थित राहून दाद दिली. कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला ही त्यांची मालिका सध्या प्रचंड गाजत असून त्यातील रत्नमाला मोहिते या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे. निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेल्याची प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली.
सत्कार कलाकारांचा
मुग्धा, प्रथमेश यांच्या सुरांना वाद्यांंचा साज चढविणाऱ्या कलाकारांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. निरंजन नेने, प्रशाांत ललित, निशाद करलगिकर, विनय चेऊलकर, मनिश तुंबरे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.