Kabutar Khana News: दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. हजारो कबुतरे असणाऱ्या या परिसराची ओळख याच कुबतरखान्यामुळे निर्माण झाली होती. मात्र मानवी जीवाला असणाऱ्या कबुतरांच्या विष्ठेमधील धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याला जैन समाजाकडून तीव्र विरोध करण्यात आला असून लावण्यात आलेली ताडपत्री काढून टाकण्यात आली आहे. दरम्यान हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. यावर आज सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दादरमधील कबुतरखाना हा अत्यंत चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कबुतरखान्यावर ताडपत्री घालून तो बंद केला होता. मात्र या निर्णयानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचेआपल्याला पहायला मिळाले. त्यानंतर या प्रकरणात मुंबई हायकोर्टात दाद मागण्यात आली होती. त्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत हायकोर्टाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे.
हायकोर्टात काय घडले?
मुंबई हायकोर्टाने दादरमधील कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे. म्हणजेच कबुतरांना अन्न, पाणी देण्यास हायकोर्टाने बंदी कायम ठेवली आहे. आम्ही दिलेल्या आदेशाचा अपमान करू नये असे देखील हायकोर्टाने म्हटले आहे. आमच्या निर्णयावर हरकत असल्यास दाद मागण्याचा पर्याय तुमच्याकडे असल्याचे हायकोर्ट म्हणाले आहे.
कबुतरे वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णय
बुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, कबूतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, कबुतरांच्या आरोग्यपूर्ण देखभालीसाठी आणि नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी कोणत्या वेळेत खाद्यपुरवठा व्हावा आणि कोणत्या वेळेत नाही याबाबत नियमावली तयार करण्यात यावी. शहरात विविध ठिकाणी कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनविषयक त्रास, विष्ठेमुळे होणारे प्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात. परंतू याबाबत कबुतरखान्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक असून, त्यासाठी संबंधित तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करावा. कबुतरांच्या विष्ठेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.