फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महाविकास आघाडीकडून आज मुंबई महाराष्ट्र स्वाभिमान सभेद्वारे प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. या स्वाभिमान सभेत बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून सरकार आल्यानंतर कृषी सन्मान योजना राबविण्यात येईल त्याबद्दल माहिती दिली, या योजनेद्वारे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल आणि जो शेतकरी नेहमी कर्ज भरतो त्याला 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सद्यस्थितीवरही कटाक्ष टाकताना त्यांनी महायुती सरकारवरही जोरदार निशाणा साधला.
महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर भाष्य
महाराष्ट्राच्या आजच्या स्थितीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र क्रमाक 1 चे राज्य होते, भाजप आणि त्यांच्या मित्रांच्या हातात सत्ता गेल्याच्या नंतर महाराष्ट्राचा क्रमांक 6 वर घसरलेला आहे. एकेकाळी कायदे आणि सुव्यवस्थेची मोलाची कामगिरी करणारे राज्य होत आज स्त्री अत्याचार वाढले. राज्यामध्ये 64 हजार महिला आणि मुली बेपत्ता आहेत ही स्थिती कधीच नव्हती. महाराष्ट्र हे शिक्षणासंबंधी नेहमी प्रगत राज्य होते. आज शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र घसरला आहे.
सिंधुदुर्गातील पुतळ्यात भ्रष्टाचाराचा विक्रम
ते पुढे म्हणाले की, शिवछत्रपती हे देशाचे स्वाभिमानाचे प्रतिक, हल्लीच्या काळात भ्रष्टाचार हा कोणत्या टोकाला गेला हे सांगायचे असेल तर एकच उदाहरण सांगतो की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवछत्रपतींचा पुतळा जो उभा केला. त्या उभारणीतही भ्रष्टाचार झाला.गेट वे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. समोर समुद्र असूनही त्या पुतळ्याला काहीही झाले नाही. पण सिंधुदुर्गतील पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण झाले तो पुतळा उद्धवस्त होतो आणि सरकारकडून सांगितले जाते की, समुद्राचा वाऱ्याने पुतळा उद्धवस्त झाला. मुंबईतील पुतळे वाऱ्याने उद्धवस्त होत नाही याचे कारण तिथे भ्रष्टाचार नव्हता. सिंधुदुर्गातील पुतळ्यात भ्रष्टाचाराचा विक्रम या सरकारने केले त्यामुळेच शिवछत्रपतींचा अपमान झाला.
शेतकरी कर्जाची माहिती देताना शरद पवार यांनी सांगितले की पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये कृषीमंत्री असताना 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले. व्याजाचा दरही 3 टक्क्यांवर आणला.
पंचसुत्री योजनेतील इतर आश्वासने
या स्वाभिमान सभेद्वारे महाविकास आघाडीने शक्तीप्रदर्शन करत कृषी सन्मान योजनेसोबतच पंचसुत्री योजनेतील इतर योजनाही जाहीर केल्या त्यामध्ये युवकांना प्रतिमहिना ४ हजार रुपये दिले जाणार, कुटूंब रक्षण योजनेत २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा व मोफत औषधे दिला जाणार, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास उपलब्ध केला जाणार जातनिहाय जनगणना करणार व 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील असणार ही आश्वासने दिली गेली.