उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका (फोटो- यूट्यूब/ShivSena UBT)
मुंबई: काँग्रेस व महाविकास आघाडीतर्फे बुधवारी प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. मुंबई येथील वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात ‘मविआ’ची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभेला’ सुरुवात झाली आहे. या स्वाभिमान सभेत विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून पंचसुत्री जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आजच्या सभेत कॉँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित केले. यावेळेस उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि आता निवडणुकांचे फटाके फुटू लागले आहेत. आपल्याकडे चांगले ॲटम बॉम्ब आहेत. तर पलीकडून फुलबाज्या सुरू आहेत. मात्र २३ तारखेला आपल्याला विजयाचे फटाके फोडायचे आहेत. सध्या महागाई इतकी वाढली आहे की अनेक घरांमध्ये फरलचे पदार्थच गायब झाले आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आपण आपल्या 5 जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले होते. आनंदाच्या शीधेमधून उंदराच्या लेंडया देते हा आहे का तुमचा आनंद?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आपले सरकार आल्यानंतर ५ जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे इतके टॅक्स लावत आहेत. कदाचित उद्या श्वास घ्यायला देखील टॅक्स लावतील. शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार असे पवारांनी सांगितले. आम्ही हवेतल्या बाता करत नाही. आम्ही जे करतो तेच बोलतो आणि जे बोलतो तेच करतो. जसे राज्यातील मुलींना मोफत शिक्षण दिले जात आहे, तसेच आमचे सरकार आल्यास मुलांना देखील मोफत शिक्षण देणार आहोत. बेरोजगारांना 4 हजार रुपयांची मदत करणार आहोत. ”
“आपली धारावी नव्हे तर संपूर्ण मुंबई अदाणीच्या घशात घालणारी जिआर निघाले. हे जीआर फेक नरेटीव्ह असतील तर? एक धारावी वसवण्यासाठी मुंबईतील २० जागा अडाणीच्या घशात घातल्या जात आहेत. म्हणजे मुंबई संपूर्णपणे अदाणीमय करून टाकायची आहे की काय? आमचे सरकार आल्यास या निविदा आम्ही रद्द करू. तसेच धारावीकरांना तिथल्या तिथे उद्योग आणि घरे दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
पंचसूत्री जाहीर
– राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार.
– युवकांना प्रतिमहिना ४ हजार रुपये देणार.
– कुटूंब रक्षण योजनेत २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा व मोफत औषधे देणार.
– महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
– जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.