मुंबईकरांनो, 28 डिसेंबरला रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?
Mumbai Local News Marathi: उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवार, २८ डिसेंबर रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमटी-चुनाभट्टी, बांद्रा स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. परिणामी लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावणार आहे.
हार्बर मार्गावर
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-बांद्रा स्थानकांदरम्यान अप-डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्ती असणार आहे. या दरम्यान सीएसएमटी ते चुनाभट्टी, बांद्रा-गोरेगाव दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातून पनवेल करिता स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे.
थर्टीफर्स्टकरिता स्पेशल लोकल
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षांच्या स्वागतासाठी दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने पर्यटक, प्रवासी आणि नागरिक येतात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने चार आणि पश्चिम रेल्वेने ८ स्पेशल लोकल बुधवार ३१ डिसेंबर रोजी रात्री चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक, पर्यटक दक्षिण मुंबईतील गेटवे आफ इंडिया, मरिन लाईन्स, नरिमन पॉइंट, सीएसएमटी आणि गिरगाव चौपाटी या परिसरात येतात. परंतु रात्री उशिरा किंवा पहाटे घरी जाण्यासाठी या नागरिकांना लोकल उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होते. पर्यटकांची हीच गैरसोय दूर करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे रात्री उशिरापर्यंत लोकल चालविण्यात येणार आहेत. या सर्व लोकल धौम्या मार्गावर धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या चार स्पेशल लोकल
सीएसएमटी-कल्याण : रात्री १.३० वाजता
कल्याण-सीएसएमटी : रात्री १.३० वाजता
सीएसएमटी-पनवेल : रात्री १.३० वाजता
पनवेल-सीएसएमटी: रात्री १.३० वाजता
परेच्या आठ स्पेशल लोकल
चर्चगेट-विरार-चर्चगेट दरम्यान आठ स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहेत. चर्चगेट ते विरार लोकल रात्री १.१५ वा. रात्री २ वा. रात्री २.३० वा आणि पहाटे ३.२५ वाजता चालविण्यात येणार आहे. तसेच विरार ते चर्चगेट लोकल रात्री १२.१५ वा, रात्री १२.४५ वा. रात्री १.४० वा आणि मध्यरात्री ३.०५ वाजता सुटणार आहे.






