ऑक्टोबरमध्ये उडणार महापालिका निवडणुकांचा बार? किती टप्प्यात होणार निवडणुका?
वाढती लोकसंख्या आणि टोलेजंग इमारती यामुळे दिवसेंदिवस अग्निशमन दलापुढील आव्हाने वाढत आहेत. त्यामुळे अग्निशमन दल अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात ७३६.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात अग्निशमनासाठी कॉम्प्रेस्ड एअर फोर्स यंत्रणा आणि ड्रोनसारखी नवी अग्निशमन यंत्रणा दलात समाविष्ट करण्याचे महापालिकेचे नियोजन असणार आहे.
गेल्या काही दशकांमध्ये मुंबईतील लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून चाळींच्या जागी मोठ्या संख्येने टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. उंच इमारतीत आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला अनेक समस्यांना तोंड देत मदतकार्य करावे लागते. ही बाब लक्षात घेऊन अग्निशमन दल अधिक सक्षम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुरक्षित अंतरावरून अग्निशमन करण्यासाठी फ्रान्समधून अत्याधुनिक यंत्रमानव आयात करण्यात आले आहेत. दाटीवाटीची लोकवस्ती आणि अरुंद रस्ते असलेल्या झोपडपट्टीभागात अग्निशमनासाठी वॉटर मिस्ट प्रणालीसह पाच मिनि वॉटर टेंडर्स ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म व हाय राईझ फायर फायटींग प्रणाली असलेली सात प्रथम प्रतिसादात्मक वाहनाच्या खरेदीचे कार्यादेश देण्यात आले असून त्यापैकी तीन वाहने यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित चार वाहने मार्च २०२५ पर्यत अग्निशमन दलात दाखल होण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ११ प्रथम प्रतिसादात्मक अग्निशमन वाहने, प्रकाश व्यवस्था व उच्च दाबाचे पाण्याचे पंप असणारी चार सहाय्यक वाहने, सहा रोबोटिक लाईफ सेव्हींग बॉईज, ३५ स्मोक एक्स्हॉस्टर व बोअर्स आदी खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
भविष्यात मुंबई किनारी रस्त्यावर (दक्षिण) वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई किनारी रस्ता (दक्षिण प्रकल्पानजिक दोन नवीन अग्निशमन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जुहू तारा रोड, सांताक्रूझ (प.), माहूल रोड, चेंबूर आणि टिळक नगर येथे नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
७५९.१८ कोटी उत्पन्न अपेक्षित
दरम्यान, अग्निशमन दलाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३०१.०२ कोटी रुपये उत्पन्न प्रस्तावित होते. ते ६८६.९६ कोटी रुपये असे प्रस्तावित करण्यात आले. यात १२८.२१ टक्के म्हणजे ३८५.९४ कोटी रुपये वाढ झाली आहे. अग्निशमन दलाकडून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ४८०.३३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. आगामी वर्षात अग्निसमन दलाकडून ७५९.१८ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.