दक्षिण मुंबईतील २० लाख रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १३,८०० इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार (Photo Credit- X)
६६० हून अधिक इमारतींची तपासणी पूर्ण
उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर असून १३ हजार ८०० इमारतीमध्ये अंदाजे २० लाख रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी मंडळाने गेल्या वर्षी १३ हजार ८०० इमारतीची टप्प्याटप्प्याने संरचनात्मक तपासणी करून अतिधोकादायक इमारती शोधून काढण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्यात एक हजार इमारतीच्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यानुसार ६६० हून अधिक इमारतींची तपासणी दुरुस्ती मंडळाने पूर्ण केली. यापैकी अंदाजे ९५ इमारती अतिधोकादायक आढळल्या होत्या.
संरचनात्मक तपासणी कंपनीकडून करून घेणार
या कारवाईमुळे अतिधोकादायक आढळणाऱ्या इमारतींचा पुनर्विकास वेगाने मार्गी लागेल असे वाटत असतानाच उच्च न्यायालयाने मंडळाची ७९ (अ) ची प्रक्रिया बेकायदा ठरवली, त्यामुळे ही प्रक्रियाच ठप्प झाली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला म्हाडाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर पुनर्विकास ठप्प झाला आहे. आता मंडळाने इमारतीची संरचनात्मक तपासणी याच क्षेत्रातील कंपनीकडून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत करण्यात आलेली तपासणी ही मंडळाकडून अंतर्गत स्तरावर केली जात होती, पण आता मात्र या क्षेत्रातील कंपनीकडून तपासणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.






