प्रसूतीसाठी आलेल्या महिलेल्याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई होणार, विलास तरे यांची मागणी
मुंबई / पालघर : मनोर ग्रामीण रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणामुळे प्रिती जाधव (वय २२ वर्षे, धुकटण गाव) हिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणी तात्काळ चौकशी आणि जबाबदार डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई अशी मागणी बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देत जोरदार मागणी केली आहे. यावेळी आमदार विलास तरे म्हणाले की, धुकटण (ता. जि. पालघर) येथील २२ वर्षीय प्रिती जाधव हिला प्रसूतीसाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने, या रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अत्यंत गंभीर निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना केवळ वैयक्तिक नाही, तर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्ट, निष्काळजी व असंवेदनशील कार्यपद्धतीचे अत्यंत भयानक उदाहरण आहे.
घटनेचा तपशील अशी की, प्रीती जाधव हिला प्रसूती दरम्यान स्थिती गंभीर झाल्याने मनोर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचाराऐवजी रुग्णाला “लवकर दुसरीकडे घेऊन जा” असे सांगून हात वर केले. रुग्णालयात 108 ॲम्बुलन्स तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली नाही. परिणामी, रुग्णाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर मनाली कोकाटे व डॉक्टर प्रशांत राजगुरू यांनी रुग्णाची गंभीर अवस्था पाहूनही जबाबदारी झटकत बाहेरच्या इस्पितळात हलविण्याचा सल्ला दिला, परंतु आवश्यक ती वैद्यकीय मदत व प्राथमिक उपचार न देता केवळ “दुसरीकडे जा” एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. गुजरात येथील इस्पितळाकडे रुग्णवाहिकेत जात असताना रस्त्यात ऑक्सिजन संपला. ऑक्सिजन सिलेंडर संपल्याने रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यातून परत आली आणि नवा सिलेंडर घेऊन पुन्हा मार्गस्थ झाली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णाचा अतिशय रक्तस्त्राव होऊन रस्त्यातच मृत्यू झाला आणि हे सर्व प्रशासनाच्या व डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे घडले. यापूर्वीही सप्टेंबर महिन्यात या रुग्णालयात सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हणजेच ही एक “अकस्मात” घटना नसून, सातत्याने चालत असलेली निष्काळजीपणाची व जबाबदारी टाळण्याची प्रणाली आहे.
मनोर ग्रामीण रुग्णालय हे संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी आशेचे केंद्र असायला हवे होते; परंतु प्रत्यक्षात ते मृत्यूकेंद्र बनले आहे. येथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी हे केवळ हजेरी लावणारे कर्मचारी बनले आहेत. ना त्यांना रुग्णसेवेची भावना आहे, ना जबाबदारीची जाणीव. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये निधी मिळतो; तरीही रुग्णालयात प्राणवायूची सोय, आपत्कालीन ॲम्बुलन्स, रक्त उपलब्धता, प्रसूती सुविधा या सर्व गोष्टींचा पुरवठा खंडित स्थितीत आहे. ही परिस्थिती केवळ दुःखद नाही तर फौजदारी गुन्ह्याच्या चौकशीस पात्र आहे. कारण एका निरपराध तरुण मातेला तिच्या मूलाला जन्म देताना जिवंत ठेवण्यात राज्याच्या आरोग्य यंत्रणेला अपयश आले आहे.
त्याअनुषंगाने मागण्या करण्यात येत आहेत की, प्रिती जाधव यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची अधिकृत उच्चस्तरीय चौकशी आदेशित करण्यात यावी. मनोर ग्रामीण रुग्णालयातील कर्तव्यावर असलेले डॉक्टर मनाली कोकाटे, डॉक्टर प्रशांत राजगुरू व संबंधित कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. मनोर ग्रामीण रुग्णालयातील 108 ॲम्बुलन्स सेवा व ऑक्सिजन पुरवठा प्रणालीची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी.
उक्त प्रकरणी मृत प्रीती जाधव यांच्या कुटुंबाला किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत व एका नातेवाईकास शासकीय नोकरी देण्यात यावी. पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांच्या कार्यपद्धतीची विशेष तपासणी मोहीम तात्काळ राबवावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. ही घटना केवळ एका रुग्णाच्या मृत्यूची नाही, तर संपूर्ण ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या अपयशाची साक्ष आहे, कडक शब्दात आमदार विलास तरे यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमदार विलास तरे यांनी मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी देखील मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.