भारतात Abbott ने आणले जगातील पहिले दुहेरी चेंबर लीडलेस पेसमेकर
जागतिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ॲबॉटने भारतात आपले अत्याधुनिक AVEIR™️ ड्युअल चेंबर (DR) लीडलेस पेसमेकर सिस्टम लाँच केल्याची घोषणा केली आहे. ही जगातील पहिली अशी पेसमेकर सिस्टम आहे, जी कोणत्याही तारांशिवाय किंवा शस्त्रक्रियेने तयार केलेल्या पॉकेटशिवाय कार्य करते आणि दोन लहान उपकरणांदरम्यान बीट-टू-बीट वायरलेस समन्वय साधण्याची क्षमता ठेवते.
पेसमेकर हे उपकरण हृदयाची गती नियंत्रित ठेवण्यासाठी वापरले जाते, विशेषतः जेव्हा हृदयाचे ठोके खूप मंदावतात, ज्याला वैद्यकीय भाषेत ब्रॅडीकार्डिया म्हणतात. पारंपरिक पेसमेकरमध्ये बारीक तारा (लीड्स) वापरून हृदयाशी जोडणी केली जाते. मात्र, या तारांमुळे संसर्ग, शस्त्रक्रियेतील गुंतागुंत आणि पुनर्प्राप्ती प्रक्रियेत विलंब यांसारखे धोके संभवतात. याच्या उलट, लीडलेस पेसमेकर ही एक अत्याधुनिक, कमी त्रासदायक आणि जलद पुनर्प्राप्ती देणारी तंत्रज्ञान प्रणाली आहे. ही उपकरणे थेट हृदयाच्या आतील भागात कॅथेटरद्वारे बसवली जातात, ज्यासाठी कोणत्याही बाह्य तारांची आवश्यकता नसते.
आजपर्यंत लीडलेस पेसमेकर फक्त हृदयाच्या एका चेंबरसाठीच वापरले जात होते. पण दोन चेंबरमध्ये अचूक समन्वय साधणे ही एक मोठी वैद्यकीय अडचण होती. अॅबॉटच्या i2i™️ (इम्प्लांट-टू-इम्प्लांट) तंत्रज्ञानाने या समस्येवर क्रांतिकारी उपाय दिला आहे. हे तंत्रज्ञान हृदयाच्या दोन चेंबरमध्ये बसवलेल्या लहान पेसमेकरना – एक वरच्या (उजवे ॲट्रियम) आणि दुसरा खालच्या (उजवे वेंट्रिकल) चेंबरमध्ये – प्रत्येक ठोक्यागणिक एकमेकांशी वायरलेस संवाद साधण्यास सक्षम करते. त्यामुळे आता रुग्णांना खऱ्या अर्थाने ड्युअल चेंबर लीडलेस पेसिंगचा लाभ मिळू शकतो, ज्यामुळे हृदयाचे ठोके अधिक नैसर्गिक, समन्वयित आणि स्थिर राहतात.
ॲबॉटच्या कार्डियाक रिदम मॅनेजमेंट व्यवसायाचे भारत, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग, तैवान आणि कोरियाचे जनरल मॅनेजर अजय सिंह चौहान म्हणाले, “AVEIR DR हे लीडलेस पेसिंग तंत्रज्ञानाच्या प्रगतीतील महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही आमच्या AVEIR VR सिंगल-चेंबर प्लॅटफॉर्मचा विस्तार करून अधिकाधिक रुग्णांना या नव्या पद्धतीचे फायदे मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. हे तंत्रज्ञान हृदयाच्या असामान्य गतीवर अधिक अचूक आणि प्रभावी उपचारासाठी डिझाइन केलेले आहे.”
कोबीची भाजी खायला आवडत नाही? मग लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट चणाडाळ कोबी
AVEIR DR प्रणालीमध्ये दोन उपकरणे आहेत – AVEIR VR, जे हृदयाच्या खालच्या चेंबरचे नियंत्रण करते, आणि AVEIR AR, जे वरच्या चेंबरला आधार देते. ही दोन्ही उपकरणे पारंपरिक पेसमेकरपेक्षा सुमारे दहापट लहान आहेत आणि AAA बॅटरीपेक्षा देखील लहान व हलकी आहेत. त्यांना हृदयाच्या आतील पृष्ठभागावर एका लहान स्क्रू-इन यंत्रणेने जोडले जाते, ज्यामुळे भविष्यात आवश्यक असल्यास ते सहजपणे काढता येतात किंवा बदलता येतात.
याशिवाय, AVEIR DR प्रणाली रिअल-टाइम पेसिंग विश्लेषण पुरवते, ज्यामुळे डॉक्टर उपकरण बसवताना त्याचे स्थान आणि कार्यक्षमता अचूकपणे तपासू शकतात. या नव्या शोधामुळे पेसमेकर तंत्रज्ञानात एक नवा युगप्रारंभ झाला आहे – जो अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि रुग्ण-केंद्रित उपचारांचा मार्ग खुला करतो.