मंत्री मंगल प्रभात लोढा (फोटो- सोशल ट्विटर)
डिजिटल गेम डेव्हलपर स्पर्धा युवकांसाठी नवी संधी निर्माण करणारी
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त विश्वास
महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात मोठी भरारी घेणार
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेली डिजिटल गेम डेव्हलपर स्पर्धा युवकांसाठी नवी संधी निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. या अभिनव उपक्रमातून महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात मोठी भरारी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्चगेट येथील इंडियन मर्चंट्स चेंबर (IMC) सभागृहात राज्य नाविन्यता सोसायटी, युनिटी आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गेम डेव्हलपर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव सौ. मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील; तमिळनाडू कौशल्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. व्ही. विष्णू, गुगल प्लेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. आदित्य स्वामी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेनुसार सर्जनशीलता आणि नावीन्यतेच्या बळावर भारत जागतिक स्तरावर अग्रस्थानी पोहोचू शकतो. कौशल्य विकासाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याच धर्तीवर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य गेमिंग आणि डिजिटल क्षेत्रात आघाडीचे केंद्र बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
With the rapid pace of global innovation in digital technology, it has become imperative to adapt to the evolving landscape. Over the years, to everyone’s surprise, gaming has emerged from a hobby into a viable career option for youngsters.Under the leadership of Hon. Chief… pic.twitter.com/EsH3meoZbX — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) April 24, 2026
मनीषा वर्मा, यांनी आपल्या मनोगतात राज्य शासनाच्या कौशल्य विकास उपक्रमांवर प्रकाश टाकताना सांगितले की, उद्योगस्नेही आणि मानकीकृत प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे युवकांना जागतिक दर्जाच्या कौशल्यांची जोड मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे रोजगारक्षमता वाढण्यासोबतच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे.
डॉ. श्रीकांत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांनी सांगितले की, नाविन्यतेवर आधारित परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांना विशेष महत्त्व आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे ५,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी ५०० विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गेम प्रकल्प सादर केले. या सर्वांचा सन्मान करण्यात आल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला. श्री. व्ही. विष्णू, यांनी उद्योग-आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या मानकांनुसार कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळते आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित होते.
या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि तमिळनाडू येथील सहभागी विद्यार्थ्यांना युनिटीचे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. गेम डिझाइन, डेव्हलपमेंट आणि मोनेटायझेशन या महत्त्वाच्या घटकांवर आधारित प्रशिक्षण या उपक्रमात देण्यात आले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या गेम्सचे सादरीकरण करण्यात आले, ज्यातून प्रशिक्षणाच्या व्यावहारिक परिणामांचे दर्शन घडले.
गेमिंग क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे उदयोन्मुख क्षेत्र असून योग्य कौशल्य आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे मंत्री श्री. लोढा यांनी नमूद केले. युवकांनी या संधींचा लाभ घेऊन नाविन्यपूर्ण क्षेत्रात प्रगती साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.






