कल्याणमध्ये ‘दिनानथ मंगेशकर’च्या घटनेची पुनरावृत्ती, प्रसूतीगृहात महिलेचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)
पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी 10 लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप केला जात आहे आहे. ही घटना ताजी असताना कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात उपचारादरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात शांतीदेवी अखिलेश मौर्य (३०) या महिलेचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. तिची शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावली. तिला इंजेक्शन दिले गेले. तिला प्रसूतीगृहातून खाजगी रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहणारी शांती देवी अखिलेश मौर्य ही महिला दोन महिन्याची गर्भवती होती. तिला या आधी तीन मुले आहे. तिच्या पतीने तिचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या शक्तीधाम प्रसूतीगृहात ४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तिचा आज चार वाजता मृत्यू झाला. हे प्रसूतीगृह बाह्य संस्थेस महापालिकेने चालविण्यास दिले आहे. या प्रकरणी तिचा पती अखिलेश यांनी आरोप केला आहे की, तिच्या पत्नीच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार आहे. त्याने सांगितले की, माझ्या पतीला स्टोनचाही त्रास होता. ती गुटखा खात होती. तिचा मृत्यू झाला आहे.
डॉक्टरांना याबाबत जाब विचारला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. तिचा मृत्यू गुटखा खात असल्याने झाल्याचे उत्तर दिले आहे. महिलेच्या पतीने केलेले आरोप डॉक्टरांनी फेटाळून लावले आहे. या प्रकरणी डॉ. गणेश डोईफोडे यांनी सांगितले की, शांती देवी मौर्य या महिलेला ४ रोजी दाखल केले होेते. तिचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करायची होती. तिला रक्त कमी होते. तिला रक्त देण्यात आले. तिला आज शस्त्रक्रिया गृहात दुपारी घेतले होते. तिची प्रकृती खालावली. तिला इंजेक्शन दिले गेले. तिला प्रसूतीगृहातून पुढील उपचारासाठी कल्याण पूर्वेतील अमेय खाजगी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका केली. तिचा खाजगी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविला जाणार आहे. प्रसूतीगृहात अतिदक्षता विभाग नाही. हे देखील डॉक्टरांनी मान्य केले आहे.
दरम्यान महिलेच्या पतीने तिचा मृतदेह महापालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यास विरोध केला आहे. दरम्यान दोन महिन्यापूर्वी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदे या गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोन डॉक्टरांना महापालिकेने सेवेतून कमी करीत त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.