संजय निरुपम यांची काँग्रेसवर सडकून टीका (फोटो सौजन्य-X)
Sanjay Nirupam on Congress news in Marathi : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील बचावलेल्या भारतीयांवर संशय घेणाऱ्या आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या देशविरोधी काँग्रेस नेत्यांचा बुरखा फाटला, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज (29 एप्रिल) केली. मुस्लिम मतांसाठी काँग्रेसवाले भारतविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे पाकिस्तान नागरिकांसोबत काँग्रेस नेत्यांना पाकिस्तानला पाठवून द्या, अशी मागणी निरुपम यांनी केंद्र सरकारकडे केली. ते बोलत होते.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधताना संजय निरुपम यांनी सडकून टीका केली आहे. यावेळी भारतीयांच्या मनात पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची भावना आहे. मात्र काँग्रेस नेते असंवेदनशील वक्तव्य करुन पहलगाम हल्ल्यातील पिडितांच्या जखमांवर मीठ चोळत आहेत, असा संताप निरुपम यांनी व्यक्त केला. रॉबर्ट वाड्रा, सिद्धरमय्या, आर.बी थिम्मापूर, सैफुद्दीन सोज, तारिख हमीद करा आणि विजय वडेट्टीवार या काँग्रेस नेत्यांची असंवेदनशील वक्तव्य पाहता इंडियन नॅशनल काँग्रेसचे नाव बदलून पाकिस्तान नॅशनल काँग्रेस करावे, अशी खरमरीत टीका निरुपम यांनी केली.
निरुपम पुढे म्हणाले की, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानविरोधात सरकारच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. मात्र काँग्रेसचे वेगवेगळ्या राज्यातील नेते पहलगाम हल्ल्यावरुन राजकारण करत आहेत. दहशतवाद्यांच्या पाठिशी घालणारी निर्लज्ज वक्तव्य काँग्रेस नेत्यांनी केल्याचे निरुपम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी पर्यटकांची ओळखपत्र पाहून, धर्म विचारुन गोळीबार केला. भारतात मुस्लिमांना नमाज पठण करु दिले जात नाही. रस्त्यांवर गर्दीमुळे त्यांना नमाज करण्यास मज्जाव केला जातो, त्यामुळे दहशतवादी हल्ला झाला, असा जावईशोध वाड्रा यांनी लावला. पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रांमध्ये पाकिस्तानी लोक या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना भारतातील काँग्रेसवाले सोबत आहेत, असे म्हणतात. काँग्रेसच्या पाक धार्जिण्या भूमिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला क्लिनचीट मिळते, असे निरुपम म्हणाले. ज्या काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या काँग्रेसचे नेते दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना पाठिशी घालणारी वक्तव्ये करतात हे निंदनीय आहे, असे निरुपम म्हणाले.