संग्रहित फोटो
पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या आणि इचलकरंजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तसेच मुख्याधिकारी श्रेणीतील ओमप्रकाश दिवटे यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी हा आदेश काढला. लोकसभा निवडणुकीपूर्वी गेल्या नऊ महिन्यांपासून पालिकेत अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे रिक्त होती.
अलिकडेच राज्य सरकारने पालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांना पदोन्नती देऊन अतिरिक्त आयुक्तपदावर नियुक्त केले. त्यानंतर एम.जे. प्रदीप चंद्रन यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरही अतिरिक्त आयुक्तांचे एक पद रिक्त होते. ओमप्रकाश दिवटे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दिवटे यांच्या नियुक्तीमुळे पालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची सर्व पदे भरण्यात आली आहेत.
दरम्यान, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि दिवटे यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर इचलकरंजी पालिकेच्या आयुक्त पदावरुन दिवटे यांच्याकडील प्रशासक पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता. आता पुणे पालिकेच्या अतिरिक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता पालिकेतील त्यांना दिलेल्या नियुक्तीवरुन देखिल वाद होणार असल्याची चर्चा आज पालिकेत रंगली होती.
एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एकाच जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. या काळात राज्य सरकारने पालिकेचे आयुक्त आणि तीन अतिरिक्त आयुक्तांची बदली केली. यामध्ये तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे आणि विकास ढाकणे यांची बदली करण्यात आली. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये डॉ. राजेंद्र भोसले यांची पालिका आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आणि पृथ्वीराज बी. पी. यांची अतिरिक्त आयुक्तपदाच्या तीन पदांपैकी एका पदावर नियुक्ती करण्यात आली. परंतु गेल्या नऊ महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्तपदाच्या दोन पदांवर नियुक्ती करण्यात आली नव्हती.