धक्कादायक! टॅक्सी चालकाने वरळी सी लिंकवरून उडी मारून संपवलं जीवन, पोलीस तपासानंतर कारण आलं समोर
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका टॅक्सी चालकाने उडी मारून त्याचं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून ऑनलाईन गेमिंगच्या नादात त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. अल्ताफ मोहम्मद हुसेन असे मृताचे नाव आहे. काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या घटनेबाबत माहिती देणारा एक फोन आला. घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
हेदेखील वाचा- मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा
मात्र, समुद्राच्या उंच लाटा आणि रात्रीच्या अंधारामुळे पोलिसांना मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यानंतचर अखेर आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी टॅक्सी चालकाचा मृतदेह सापडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ऑनलाइन गेमिंगच्या नादातून अल्ताफ मोहम्मद हुसेन याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून अल्ताफ मोहम्मद हुसेन नावाच्या टॅक्सी चालकाने त्याचं जीवन संपवलं आहे. सात दिवसांपूर्वीच हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला. फोनवर या घटनेबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर सी लिंकजवळ उभ्या असलेल्या कारमधून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याचे आढळून आले.
हेदेखील वाचा- कुडाळमध्ये पालकमंत्री चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन, २५० स्पर्धक होणार सहभागी
पोलिसांनी पुढे सांगितलं की, रात्रीचा अंधार आणि समुद्राच्या उंच लाटा यामुळे मृतदेह सापडला नाही. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वरळी पोलीसांना मृतदेह शोधण्यात यश आलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ऑनलाईन गेमिंगमुळे हा सर्व प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अल्ताफ मोहम्मद हुसेन उत्तर प्रदेशातील रहिवासी असून तो गोवंडीत कामानिमित्त राहत होता. त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन होते. हुसेनच्या नातेवाईकांना मृतदेह त्यांच्या मूळ गावी न्यायचा आहे. आम्ही जबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेत आहोत. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.
सुमारे 14 हजार कोटी रुपये खर्चाचा ‘कोस्टल रोड’ 13 सप्टेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. हा मोटरवे वांद्रे-वरळी ‘सी लिंक’ शी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करतो, प्रवासाचा वेळ कमी करतो आणि दक्षिण मुंबई आणि उपनगरांदरम्यान वाहतूक सुलभ करतो.
‘कोस्टल रोड’ आणि ‘सी लिंक’ला जोडणाऱ्या रस्त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. कोस्टल रोडने दक्षिण मुंबईहून वांद्रेकडे जाणारी वाहने सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत थेट ‘सी लिंक’मध्ये प्रवेश करू शकतात, तर दक्षिणेकडे जाणारी वाहने ‘कोस्टल रोड’च्या दोन्ही बाजूने ‘सी लिंक’मध्ये प्रवेश करू शकतात ‘सी लिंक’ ला जोडले जाईपर्यंत विद्यमान मार्गाचा अवलंब करावा लागेल.