आज ठरणार 'नगरां'चे शिलेदार ! मतमोजणीकडे नजरा, राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे, कुणाचा गुलाल उधळ
Maharashtra Local Body Election Result 2025 News Marathi: स्थानिक स्वराज्य संस्थांतील पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीचे बहुप्रतिक्षीत निकाल रविवार, २१ डिसेंबरला जाहीर होतील. मंगळवार, २ डिसेंबरला मतदान झाल्यानंतर तब्बल २० दिवसानंतर लागणार असलेल्या या निकालात ‘नगरां शिलेदार कोण आणि कुणाचा गुलाल उधळला जाणार, हे स्पष्ट होईल. मतमोजणीकडे अवघ्या जिल्हयाची नजर राहणार असून, सर्व राजकिय पक्ष विजयाचे दावे-प्रतिदावे करीत आहेत. १५ नगरपरिषद व १२ नगरपंचायतीतून २७नगराध्यक्ष व ५३७ नगरसेवक निवडले जाणार आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणूकीच्या दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ४ ठिकाणच्या ९ जागांची मतदान स्थगित केले होते. शनिवार, २० डिसेंबरला या जागांसाठीही मतदान आटोपले. त्यामुळे एकत्रितपणे सर्व २७ नगरपरिषद व नगरपंचातच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत.
१० नोव्हेंबरपासून नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकींच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटपानंतर प्रचाराला खरी रंगत आली. राजकीय पक्षांनी २१ नोव्हेंबरपासूनच आपल्या प्रचाराचा धडाका लावला. पहिल्यांदा मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत म्हणजेच सोमवार, १ डिसेंबरला रात्री १० पर्यंत प्रचाराची मुदत वाढविण्यात आलो. मंगळवार, २ डिसेंबरला मतदान झाले. परंतु, मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मतमोजणी पुढे ढकलत, २१ डिसेंबरला जाहीर केली. या काळात स्थगीत झालेल्या चार नगरपरिषद व नगरपंचायतच्या ९ जागांवर मतदानही घेण्यात आले. आता निकालाची सर्वांना उत्सुकता राहीली आहे. यावेळी महायुती व मविआने स्वतंत्रणे निवडणूका लढविल्या. मैत्रीपूर्ण लढती झाल्या. ७, २९, ८१० मतदारांनी या निवडणूकीत ८५३ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभांनी रंगत आणली. प्रचारावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. अफवांचाही बाजार गरम झाला. सर्वच राजकीय पक्ष, अपक्ष संपूर्ण ताकदीने कामाला लागले होते. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने आपली राजकिय ताकद यानिमित्ताने आजमविण्याचा प्रयत्नही झाला.
कामठी नगर परिषद निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली. येथील निकालही यावेळी सर्वाधिक चर्चेला जाणार. दीड दशकापासून सोबत असलेले भाजप-बरिएमंच (अॅड. सुलेखा कुंभारे) यांच्यात बोगस मतदानावरून वादावादी झाली. युती तुटल्यानंतर एकमेकांविरोधात निवडणूक लढविल्या गेली. या नगरपरीषदेतील नगराध्यक्षपदाचे चारही उमेदवार दमदार असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा राहणार आहे.






