विरोधी पक्षाच्या आमदारांचा विधिमंडळाच्या पासचा खुला बाजार सुरू असल्याचा आरोप
नागपूर : राज्यात नवे सरकार गुरुवारी (दि.5) सत्तारूढ होईल. यासोबतच 15 व्या विधानसभेतील नव्या सरकारची नव्या इनिंगला सुरुवात होईल. 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह काही मंत्र्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर मुंबईतच नव्या आमदारांचा शपथविधी आणि विश्वासदर्शक ठरावही मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर नियमानुसार नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल.
हेदेखील वाचा : मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी पुणे न्यायालयात गैरहजर, सावरकरांच्या वकिलांनी केली कारवाईची मागणी
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हे हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत होईल, असे सांगितले जात आहे. याच अधिवेशनात नव्या विधानसभाध्यक्षांची निवड होईल, असे मानले जात आहे. तोवर कार्यवाहक विधानसभाध्यक्ष म्हणून सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या कालीदास कोळंबकर यांच्याकडे सभागृह संचालनाची जबाबदारी असेल, असे बोलले जात आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी नव्या सरकारच्या स्थापनेपूर्वीच जय्यत तयारी करण्यात येत आहे. विधानभवनासह रवीभवन, नागभवन, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सज्ज झाले आहेत. नागपूर करारानुसार येथे एक महिन्याचे हिवाळी अधिवेशन होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, तीन आठवड्यावर अधिवेशन कधीच झाले नाही. यावेळी तर नवे सरकार असल्याने एवढ्या कालावधीचे अधिवेशनही घेतले जाणार नाही. केवळ नागपूर कराराची औपचारिकता पूर्ण करण्याचाच प्रयोग असेल.
दरम्यान, नवे सरकार व नवे मंत्रिमंडळातील सदस्यांचे खातेवाटपानंतर मंत्र्यांना खातेनिहाय अभ्यास करायला अत्यंत कमी कालावधी मिळेल. दहा दिवसांत मंत्र्यांना त्यांच्या विभागाची माहिती करून घ्यायची आहे. सोबतच सभागृहात त्यांच्या खात्याशी काही प्रश्न वा विषय असेल तर त्यावरही उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे विशेष अधिवेशनानंतर काही दिवस मंत्र्यांना मिळावा, असा प्रयत्न आहे.
घाईगर्दीतील अधिवेशन
15 व्या विधानसभेतील पहिल्या सत्रातील हे पहिलेच हिवाळी अधिवेशन असेल. यापूर्वी कधीही एवढ्या घाईगर्दीत अधिवेशन घेण्यात आले नाही. नागपूरचे हिवाळी अधिवेशनात सभागृहातील अंतरंग मोठ्या प्रमाणात बदललेले दिसेल. महायुतीला 235 आमदार आहेत. विरोधी बाकावर मविआचे 50 आमदार असतील. त्यामुळे सत्तापक्षाचे आमदारही विरोधी बाकाच्या बाजूवर मोठ्या प्रमाणात आसनस्थ झालेले दिसतील.
कार्यवाहक विधानसभा अध्यक्ष
वडाळाचे भाजप आमदार कालीदास हे विधानसभेचे दुसऱ्यांदा कार्यवाहक विधानसभाध्यक्ष असतील. यापूर्वीही त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. 1995 मध्ये असलेल्या युती सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले कोळंबकर हे मुळचे शिवसैनिक आहेत. ते वडाळाचे शिवसेनेचे आमदार होते. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर ते त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये आले. तेव्हा ते काँग्रेसचे आमदार होते. राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर ते त्यांच्यासोबत भाजपमध्ये आले. 1990 पासून सातत्याने वडाळाहून निवडून येणारे कोळंबकर यंदा विधानसभेवर नवव्यांदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत.
हेदेखील वाचा : मुख्यमंत्री ठरत नसतानाच आता उपमुख्यमंत्रिपदासाठी समोर आली ‘ही’ नावं; महायुतीत खातेवाटपावरून पेच कायम