File Photo : Election Rally
नागपूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रतीक्षा न बघता अनेक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी यात आघाडी घेतली असून, अपक्षांना मात्र चिन्हाची प्रतीक्षा आहे. उमेदवारांनी तूर्तास घरोघरी भेट देण्यावर भर दिला आहे. 5 नोव्हेंबर अर्थात आजपासून प्रचारसभा रंग भरणार आहे.
30 नोव्हेंबरला अर्ज छानणीनंतर राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चिंत झाले. त्यांनी जोरकसपणे प्रचार सुरू केला. पक्षाने उमेदवारी घोषित केली तेव्हापासूनच काही उमेदवारांचा प्रचार सुरू झाला होता. त्याला आता वेग आला आहे. दक्षिण पश्चिममध्ये भाजपचे उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, वंचितचे विनय भांगे, बसपचे सुरेंद्र डोंगरे, पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाचे ओपुल तामगाडगे यांनी घरोघरी प्रचार आरंभला आहे.
पश्चिममध्येही काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा प्रचार कधीच सुरू झाला. त्यांचे कार्यकर्ते वस्ती पिंजून काढत आहे. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर भाजप कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. वंचितचे यश गौरखेडे, आपच्या बंडखोर अल्का पोपटकर, बसपाचे प्रकाश गजभिये यांचा प्रचार सुरू झाला आहे.
तरुणांना सोबत घेऊन उमेदवार देताहेत भेटी
मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी शेळके हे उमेदवारी घोषित होताच तरुणांना सोबत घेऊन परिसर पिंजून काढत आहे. भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांनीही अनेक भागात भेटसत्र सुरू केले आहे. रविवारीच हलबा समाजाकडून रिंगणात उतरलेले माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांनी तर काही तासातच चार ठिकाणी रॅलीही काढली. पूर्वमध्ये भाजपचे कृष्णा खोपडे, राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे, काँग्रेस बंडखोर पुरूषोत्तम हजारे यांनी प्रचाराला सुरुवात केली. जय विदर्भ पार्टीचे मुकेश मासूरकर यांचाही प्रचार सुरू आहे.
बंडखोरांसह अपक्ष देताहेत भेटीगाठी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बंडखोर व अपक्ष उमेदवार आभा पांडे यांनीही काही महिन्यांपूर्वीपासूनच मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. काँग्रेसच्या संगीता तलमले यांनी पक्षाला ही जागा न गेल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे.